संग्रहित छायाचित्र
गडचिरोलीत :आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची मोठी कन्या भाग्यश्री अत्राम शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. याबाबत धर्मरावबाबा अत्राम यांनी गडचिरोलीतील जनसन्मान यात्रेत कठोर शब्दांत टीका केली. जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकली नाही, ती तुमची कशी होऊ शकेल, असा प्रश्न त्यांनी सभेवेळी उपस्थित केला.
धर्मरावबाबा अत्राम यांनी यावेळी मुलगी भाग्यश्री व जावई ऋतुराज हलगेकर यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांच्याशी संबंध संपल्याचं जाहीर केले. तसेच दगा देणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे, असेही ते म्हणाले. अत्राम म्हणाले, वारे येत-जात राहते. लोक पक्ष सोडून जात असतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आमच्या घरचे काही लोक मला वापरून दुसऱ्या पक्षात जाणार आहेत. ४० वर्षं लोकांनी पक्षफोडीचे कार्यक्रम केले. आता घरफोडी करून माझ्या मुलीला माझ्या विरोधात उभं करण्याचा धंदा शरद पवार गटाचे लोक करत आहेत. त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. माझा जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका.
अत्राम म्हणाले, या लोकांनी धोका दिला आहे. त्यांना बाजूच्या प्राणहिता नदीत सगळ्यांनी फेकून दिलं पाहिजे. हे काय चाललंय? सख्ख्या मुलीला बाजूला घेऊन तिच्या बापाच्या विरोधात उभं करत आहात. जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकली नाही, ती तुमची कशी होऊ शकेल? याचा तुम्हाला विचार करावा लागेल. ती काय लोकांना न्याय देणार आहे? राजकारणात ही माझी मुलगी आहे, भाऊ आहे, बहीण आहे हे मी काही बघणार नाही.