सांगलीत मतदारांनी केला करेक्ट कार्यक्रम !

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तेथील राजकारणाचे ताणे-बाणे समजावून घेण्यापूर्वी विजयाचे मतदारांनी केलेला करेक्ट कार्यक्रम असे वर्णन करता येईल.

संग्रहित छायाचित्र

विशाल पाटलांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याने काँग्रेसची शंभरी

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तेथील राजकारणाचे ताणे-बाणे समजावून घेण्यापूर्वी विजयाचे मतदारांनी केलेला करेक्ट कार्यक्रम असे वर्णन करता येईल.

 ज्येष्ठ नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या उतरतीच्या काळात काँग्रेसची पकड हळूहळू ढिली होत असलेल्या सांगलीने पुन्हा एकदा आपला काँग्रेसवरील विश्वास दाखवून दिल आहे. सांगलीकरांनी वसंतदादांच्या नातवाच्या हाती म्हणजे विशाल पाटलांच्या हाती सांगलीची पाटीलकी सोपवली आहे. काँग्रेस, वसंतदादा आणि सांगलीतील घट्ट नाते पुन्हा एकदा प्रस्थापित झाले आहे. काँग्रेसचा मतदारसंघावरील पगडा एकेकाळी एवढा घट्ट होता की, त्याकाळी लोक म्हणायचे की, काँग्रेसने दगड जरी उभा केला तरी तो दिल्लीला निवडून जाईल. वसंतदादांचे निधन आणि अयोध्येतील रामजन्मभूमीचे आंदोलन यामुळे काँग्रेसवरील मतदारांची निष्ठा १९८९ नंतर हळूहळू पातळ होत गेली. तरीही सांगली काँग्रेसच्या विचाराशी ठाम असायची. सामान्य नागरिक नेहमी म्हणायचे की, सांगलीत काँग्रेस जेव्हा पराभूत होईल तेव्हा काँग्रेसची देशावरील पकड सैल झालेली असेल. असेच काहीसे सांगलीत घडले ते २०१४ मध्ये. त्यावेळी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उभे राहिलेले पण मूळचे काँग्रेस विचाराचे असलेले संजयकाका पाटील यांनी दिल्ली गाठली. त्यावेळी संजयकाका यांनी प्रत्यक्ष नरेंद्र मोदी प्रचार सभा घेणार असले तरच भाजपची उमेदवारी स्वीकारू अशी अट घातली होती. ठरल्याप्रमाणे मोदींची मिरजेत सभा झाली आणि संजयकाकांनी वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांना पराभूत केले. सांगली मतदारसंघ प्रथमच काँग्रेसने २०१४ मध्ये गमावला. 

सांगलीत विशाल पाटील यांनी विजय मिळवला एवढाच या घटनेचा अर्थ नसून भविष्यात जिल्ह्याचे किंबहुना पश्‍चिम महाराष्ट्राचे नेतृत्व कोण करणार याचाही अर्थ या निकालामागे आहे. सांगलीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे डॉ. विश्‍वजित कदम यांच्यातील राजकीय नेतृत्वाची लढाई सर्वश्रूत आहे. उमेदवारी वाटपावेळी जयंत पाटलांचे मौन आणि विशाल यांच्या उमेदवारीसाठी कदमांनी दिल्लीपर्यंत केलेली पायपीट पाहता जिल्ह्यातील नेतृत्व स्पर्धा आता तीव्रपणे पुढे येणार आहे.सांगलीचा राजकीय इतिहास पाहिला तर ही जागा सहजासहजी ठाकरे शिवसेनेला गेली कशी हा प्रश्‍न आहे. कोल्हापूरच्या बदली सांगली हे कारण पटणारे नाही. सांगली, मिरज ही शहरे सोडल्यास अन्यत्र शिवसेना अभावाने जाणवते. निवडणुकीच्या तोंडावर निधन झालेले विट्याचे आमदार अनिल बाबर यांची ताकद ही वैयक्तिक आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीची जागा शिवसेनेला जाणे हा राजकीय घातपात असल्याची शंका आल्यास आश्चर्य वाटणार नाही. उद्धव ठाकरेनी नवख्या चंद्रहार पाटील यांच्यामागे ताकद उभी करण्याऐवजी विशाल पाटील यांनाच उमेदवारी दिली असती तर वाद निर्माण झाला नसता. ठाकरे शिवसेनेची सांगलीत ताकदच मुळात तोळामासा आहे.

विशाल पाटील यांना घेऊन कदम यांनी दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी केलेली. परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने मतदारसंघही ढवळून काढलेला. असे असताना अखेरच्या क्षणी जागा वाटपात सांगली शिवसेनेला आंदण देण्यासाठी कोण प्रयत्नशील होते हे चाणाक्षांना लगेच समजण्यासारखे आहे. या राजकीय खेळीमागे जुना बापू-दादा वाद असल्याच्या समजाला खतपाणी मिळत गेले. जयंत पाटील यांच्याकडे संशयाची सुई गेली. त्यांना किमान पाच वेळा यामध्ये आपला सहभाग नसल्याचे सांगावे लागले. या वादातही कदम आणि पाटील यांनी संयम ढळू दिला नाही आणि आपल्या लक्षाकडे वाटचाल सुरू ठेवली. दुसऱ्या बाजूला आमदार जयंत पाटील यांनी प्रचार करूनही चंद्रहार पाटील यांना जेमतेम पाच टक्के मिळवली. खासदार राऊत यांनी मागणी करूनही काँग्रेसने कारवाई टाळण्यामागे सूत्रबद्ध नियोजन आणि छुपा पाठिंबा होता हे उघड झाले आहे. काँग्रेसची संघटित ताकद विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली, मिरज, जत आणि पलूस-कडेगाव मतदारसंघात आश्‍वासक ठरणार आहे.

विशाल पाटील यांना ५ लाख ६९ हजार ६८७ मते मिळाली, तर भाजपचे संजयकाका पाटील यांना ४ लाख ६८ हजार ५९३ मते मिळाली. यामुळे विशाल पाटील हे १ लाख १ हजार ९४ मतांनी विजयी झाले. ठाकरे शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना केवळ ६० हजार ३६० मते मिळाली. वसंतदादांच्या नातवाला उमेदवारी नाकारल्याने झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर विशाल- विश्वजीत जोडी स्वार झाली.  विशाल पाटील यांना ४८.८९ टक्के, संजयकाका पाटील यांना  ४०.३३, चंद्रहार पाटील यांना ५.२० टक्के मते मिळाली.

सांगलीत आतापर्यंत १२ लोकसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील यांच्या घराण्यानेच लोकसभेवर प्रतिनिधीत्व केले आहे. २०१४ आणि २०१९ या सलग दोन पराभवामुळे सांगलीवरील काँग्रेसची पकड सैल झाली होती. सलग तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात असलेले खासदार पाटील यांच्याबाबत भाजपअंतर्गत मोठा असंतोष होता. पहिल्या टप्प्यातच त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षांतर्गत विरोध सुप्तावस्थेतच राहिला आहे. पक्षातून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्नही फारसे झाले नाहीत. 

विशाल पाटील अपक्ष असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या दिमतीला होते. मतदारसंघातील जत, पलूस-कडेगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे, तासगाव-कवठेमहांकाळ राष्ट्रवादी शरद पवार गट असे तीन मतदारसंघ होते. भाजपकडे मिरज, सांगली आणि शिवसेना शिंदे गटाकडील खानापूर-आटपाडी हे तीन मतदारसंघ होते. कागदावर दोन्ही बाजूची ताकद समान दिसत असली तरी राष्ट्रवादी, शिवसेनेतील फूटही मतविभाजनाला कारणीभूत ठरली. वंचित बहुजन आघाडीने अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याचा फायदा विशाल यांना झाला. गेल्या निवडणुकीत वंचितच्या पडळकरांना तीन लाखांवaर मतदान होते. संजयकाकांना माजी राज्यमंत्री अजित घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप यांचा विरोध होता. भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी तर उमेदवार बदलण्याची मागणी करून संजयकाकांना आपला विरोध दर्शवला होता.

आता खासदार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असून यामुळे काँग्रेसला लोकसभेत भरी गाठता आली आहे. खरे तर विशाल पाटलांना भाजपच्या गटात जाऊन सत्तेच्या वळचणीला राहत लाभाची गणिते मांडता आली असती. मात्र, त्यांनी आपले आजोबा आणि काँग्रेसच्या विचारसरणीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest