संग्रहित छायाचित्र
जळगाव: महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल तर त्याला सोडणार नाही. त्याला मदत करणाऱ्यांनाही सोडणार नाही. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर त्याचा हिशोब केला जाईल. सरकार येईल, जाईल, पण प्रत्येक काळात महिलांची प्रतिष्ठा अबाधित राहिलीच पाहिजे, अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात महिला अत्याचाराबाबत भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला. तसेच महिला अत्याचारांच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दलही भाष्य केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कायदा कडक करत असल्याचे त्यांनी सांगितले. आधी तक्रारी येत होत्या. वेळेत एफआयआर होत नाही. सुनावणी होत नाही. खटला उशिरा सुरू होतो. निर्णय उशिरा येतो. या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केल्या आहेत. एक चॅप्टर महिला आणि बाल अत्याचाराचा आहे. पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचे नसेल तर ई एफआयआर करू शकते. ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चौकशी चांगली होईल आणि दोषींवर शिक्षा करण्यास मदत होईल, असे मोदींनी म्हटले.
फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद
नव्या कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची. त्यावर शिक्षा होत नव्हती. आता यावर आम्ही कायदे केले आहेत. देशातल्या प्रत्येक सरकारला माझे आवाहन आहे. त्यांना लागेल ती मदत केंद्र सरकार करेल. यात जो कोणी दोषी असेल त्याला कसल्याही स्थितीत सोडायचे नाही. याशिवाय दोषीला जे कोणी मदत करत असतील तेही तितकेच दोषी आहेत. मग ते रुग्णालय असो शाळा असो ऑफिस असो पोलीस असो ज्या स्तरावर चूक झाली असेल त्या सर्वांचा हिशोब झाला पाहिजे, असेही मोदी म्हणाले.