संग्रहित छायाचित्र
राज्यासह देशात गाजलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार एमपीएससीकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या जाहीर झालेल्या तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची पोलखोल होणार असल्याचे बोलले जात आहे.
एमपीएससीने २० मार्च २०२४ रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमधील काही उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी २९ जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पूजा खेडकर प्रकरणानंतर अनेकांनी विविध प्रकारची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रमाणपत्राची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जाऊ लागली आहे.
खेडकर प्रकरणामुळे ‘सर्वसामान्य उमेदवारांना कष्ट करूनदेखील सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. असे अनेक उमेदवार असतील ज्यांनी अनेकांच्या नोकऱ्या खाल्ल्या असतील,’ अशी चर्चा रंगली आहे. गेल्या काही वर्षात खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नोकरी मिळविली असल्याचे समोर आले होते. त्यावर राज्य सरकारने कारवाई करण्याऐवजी अशी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांचे भविष्य खराब होऊ नये, समाजात त्यांची अब्रू जाऊ नये, असे सांगत अभय योजना आणली होती. त्यापैकी काही जणांनी स्वत:हून खोटे प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती सरकार दरबारी सादर केली. परंतु त्यानंतर या प्रकरणावर पडदा घालण्यात आला. त्यामुळे खोटे प्रमाणपत्र सादर करूनदेखील कोणतीही शिक्षा अथवा कारवाई होत नाही. उलट संबंधित उमेदवारांच्या भविष्याचाच विचार केला जात असल्याचे संदेश राज्यभर गेला. त्यामुळेच खोटी प्रमाणपत्रे सादर करण्याचे सत्र अद्यापही सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित उमेदवारांनी २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित अपिलीय प्राधिकरण यांच्याकडे उपस्थित राहावे लागणार आहे. त्यावेळी उमेदवारांनी त्यांचे आवश्यक कागदपत्र बरोबर घेऊन येणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवारांनी दिलेल्या कालमर्यादेत दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे एमपीएससीकडून गृहीत धरले जाईल. तसेच त्याची उमेदवारीही प्रक्रियेतून रद्द करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
या उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार स्नेहल विलास नौकुडकर, आदित्य अनिल बामणे, बाळू दिगंबर मरकड, श्रीराम कुबेरराव मस्के, पुरुषोत्तम दादासो कोकरे, सचिन वसंत जाधव, मनोज मारुती भोगटे, भारत किसन गंगावणे या उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उमेदवारांना पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर येथील सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र वितरित केले आहे.
पूजा खेडकर यांनी मिळवली अनेक दिव्यांग प्रमाणपत्रे
पूजा खेडकर यांनी नगरमधील जिल्हा रुग्णालयातून दोन वेळा अपंगत्व प्रमाणपत्र घेतले. पहिले प्रमाणपत्र त्यांनी २०१८ मध्ये दृष्टी अधू असल्याचे घेतले. त्यानंतर तेथूनच त्यांनी २०२० मध्ये मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र घेतले. एवढेच नव्हे तर ऑगस्ट २०२२ मध्ये पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाकडून अस्थिव्यंगाचे प्रमाणपत्र मिळविले. मात्र, त्यात त्यांना केवळ ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे दाखविण्यात आले. त्याच वेळी त्यांनी औंधमधील जिल्हा रुग्णालयातही प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची धक्कादायक बाब समोर आली. अस्थिव्यंगासाठी वायसीएम रुग्णालयाने आधीच प्रमाणपत्र दिले असल्याने औंध रुग्णालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता.