संग्रहित छायाचित्र
राज्यातील आरोग्य यंत्रणेचे बारा वाजलेले असताना राज्यातील एक फुल आणि दोन हाफ कुठे बसले आहेत, असा सवाल उपस्थित करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी (दि. ६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) यांच्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मौनावर सडकून टीका केली.
‘‘यातील एक फुल आणि एक हाफ केंद्रात बैठकीला बसले आहेत, तर दुसरे हाफ कुठे गेले? नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यात यावी,’’ अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. नांदेड जिल्हा रुग्णालयातील अधिष्ठात्यांवर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
नांदेडमधील अधिष्ठात्यांना मस्तवाल खासदारांनी शौचालय साफ करायला लावले. हे चुकीचेच आहे. नंतर त्या अधिष्ठात्यांवर दबाव टाकण्यासाठीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. केवळ नांदेडच्या अधिष्ठात्यांवरच गुन्हा दाखल का करण्यात आला, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील संबंधित जबाबदार व्यक्तीवरही कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील याच आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आपण कोविडचा यशस्वीपणे सामना केला होता. मात्र, आता त्याच आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सध्याच्या सरकारला राज्याचे आरोग्य संभाळता येत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. कोविड काळातही आम्ही औषधांचा तुटवडा होऊ दिला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. विनानिविदा औषध खरेदी म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण असल्याचा आरोपही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या कामाची चौकशी करण्यात येत आहे. अशीच चौकशी करायची असेल तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या मनपाची चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यात उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील मनपाच्या कारभाराचीही चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. वृत्तसंस्था
सरकारकडे जाहिरातीसाठी पैसे मात्र, औषध खरेदीसाठी नाहीत...
सध्या सरकारकडे जाहिराती करायला पैसे आहेत. मात्र, औषध खरेदी करायची म्हटले की त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच रुग्णांचे बळी गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात आजारांची नाही तर भ्रष्टाचाराची साथ असल्याचा आरोप करीत सर्व सरकारी दलालांची चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
नागपूरमध्ये पूर आल्यानंतर तेथे जाण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय चित्रपटातील अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत फोटो काढण्यात व्यस्त होते, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात टास्क फोर्स स्थापन करण्यात आले होते. ते टास्क फोर्स आता काय करतेय? या टास्क फोर्समध्ये अनेक तज्ज्ञांचा समावेश होता, त्यांचा वापर आता का करण्यात येत नाही, असा प्रश्नदेखील ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.