गर्भवतीला झोळीतून नेण्याची वेळ; मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात पायाभूत सुविधांची वानवा

मुंबई: मुरबाड तालुक्यातील धसई ओजीवले या कातकरी वाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अजून प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 28 Jun 2024
  • 04:06 pm

संग्रहित छायाचित्र

मुंबई: मुरबाड तालुक्यातील धसई ओजीवले या कातकरी वाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अजून प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे.  ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी व कातकरी समाजाची लोकं राहतात. मुंबईनजीक हा जिल्हा असूनही अनेक खेड्या-पाड्यात आणि वस्त्यांवर प्राथमिक सुविधा नाहीत. रुग्णालय तर दूरवर पण काही गावांत रस्त्यांचादेखील अभाव आहे. याचमुळे महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर झोळीतून नेण्याची वेळ आली आहे. ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील काही गावांतही अशीच परिस्थिती आहे.

चित्रा जाधव ही महिला माहेरी प्रसूतीसाठी ओजीवली या कातकरी वाडीत आली होती. प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी  रुग्णवाहिका आली. मात्र कातकरी पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने तिला काही अंतरापर्यत बांबूची डोली करून  रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले, त्या नंतर तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती झाली. मात्र या घटनेवरून अजूनही आदिवासींपर्यंत विकास पोहोचला नाही हे दिसून येत आहे.  दरम्यान, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही हा व्हीडीओ ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारा व्हीडीओ !

व्हीडीओ ट्विट करत म्हटले आहे की, 'सामान्यांचे सरकार' अशी जाहिरातबाजी करणाऱ्या या सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारा हा व्हीडीओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आहे. हा व्हीडीओ ज्या मुरबाडमधील आहे तिथले आमदार भाजपाचे असून तिथले भाजपचे खासदार गेली पाच वर्षे केंद्रात मंत्री होते. हे सरकारमध्ये रस्त्यांमध्ये तर दोन हातांनी कमिशन खाल्ले जातेच पण मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू मंत्र्याने ॲम्बुलन्स खरेदीत खेकड्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दलाली खाल्ली त्या मंत्र्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्बुलन्सही देता येऊ नये? त्यामुळेच प्रसूतीकळा आलेल्या गर्भवती महिलेला असे झोळीतून न्यावे लागले आहे. मुख्यमंत्री महोदय, सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणारच नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest