संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर असून येथील लोकांत मनाची श्रीमंती, आध्यात्मिकता गुण दिसून येतात. आपल्या समाजात ज्ञानेश्वर हवेत, पण विज्ञानेश्वरही हवे आहेत, असे प्रतिपदान ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी येथे केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, पालकमंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. माशेलकर म्हणाले, आपण लक्ष्मी आणि सरस्वती यांची वेगवेगळी पूजा करतो. सरस्वतीकडून आपण लक्ष्मीकडे जातो. शिक्षण घेऊन आपण धन कमवतो. म्हणजे ज्ञानातून अर्थार्जनाकडे जातो. स्टार्टअपमध्ये आपण आता चांगली प्रगती केली आहे. आपली बेडूक उडी आता हनुमान उडी झाली आहे. मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की तुम्ही कुठे जन्मला, कुठल्या परिस्थितीत जन्मला हे महत्त्वाचे नाही. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. माझा जन्म गोवा येथील माशेल गावी झाला. गरीब कुटुंबात जन्म घेऊन एका गरीब मराठी शाळेत शिकलो असलो तरी माझे काही बिघडले नाही. ज्या देशात शिक्षकाला मान, सन्मान नाही त्या देशाचा विकास कधीच होऊ शकत नाही. शिक्षणामध्ये ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन, विचार संवर्धन, क्षमता संवर्धन असणे गरजेचे आहे. आज गुगल हा आपला गुरू झाला आहे.
यावेळी नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी नाना पाटेकर म्हणाले, आजपर्यंत मला कोणीही जात विचारली नाही. माझी जात कलावंताची आहे. माझा स्वभाव तिरसट आहे, तरीही मी नाट्य क्षेत्रात टिकून आहे. सर्वांनी साहेब ही उपाधी काढून टाकली पाहिजे. साहेब म्हटल्याने आपल्यातील अंतर वाढलेले दिसते. माझे कपडे सदैव चुरगळलेले दिसतात. कारण समोरच्याला वाटू नये की, त्याच्यात आणि माझ्यात अंतर आहे. हिंदू-मुस्लीम भेदभाव उपयोगाचा नाही. आपण सर्व एकत्रच राहणार आहोत. राजकारणी आपमतलबी असू शकतात, हे ओळखण्याची जबाबदारी आपली आहे. चार टकली आपल्यामध्ये भानगडी लावत असतील तर त्यांच्यावर फुल्ली मारा. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.