संग्रहित छायाचित्र
मुंबई: मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या संततधारेने गुरुवारी गंभीर स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी महापुराची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने मदत कार्याला वेग दिला आहे. पावसाने उघडीप दिली नाही तर राज्याच्या काही भागात ओला दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत.
मुंबईच्या दादर, वरळी, लालबाग, भायखळा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. उपनगरातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईत काही भागात अतिमुसळधार पाऊस पडला तर ६०-७० किमी ताशी अशा वेगाने वारे वाहात होते. मुसळधार पावसामुळे तीनही मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत होत्या. त्यामुळे आज कार्यालय गाठण्यासाठी नोकरदारवर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे. चक्रिय वातस्थिती विरुद्ध दिशेने येणारे वारे त्याचवेळी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात सक्रिय मोसमी वारे याचा एकत्रित परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण वाढले आहे.
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्याने सिंहगड रस्ता आणि निंबज वसाहतीत पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढून गंभीर स्थिती निर्माण झाली. अडकलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठी अखेर लष्कराला बोलावण्याची पाळी आली.
लोणावळा, खंडाळा परिसरात सुरू असलेल्या पावसाचा खोपोली, खालापूर, आपटा परिसराला फटका बसला आहे. पाताळगंगा नदीने सकाळीच इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे खोपोलीतील सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. वाकण पाली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. ताम्हाणी घाटात दरड कोसळल्याने, कोलाड पुणे मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली तालुक्याला पावसाने गेले दोन दिवस चांगलेच झोडपून काढले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेत पाणी शिरून पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी तत्काळ राष्ट्रीय आपत्ती सेवा दल (एनडीरफ) तैनात करण्यात आले आहे. खेड तालुक्यात बुधवार सायंकाळ पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. खेड-दापोलीत पडणा-या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी खेड बाजारात शिरण्यास सुरुवात झाली. देवना पूल, तांबे मोहल्ला येथील रस्त्यावर रात्री पाणी भरण्यास सुरुवात झाली. पुराचे पाणी खेड मटण मार्केटपर्यंत आल्याने व्यापा-यांची धावपळ उडाली. गुरुवारीही पावसाने जिल्ह्यातील काही भागात जोर कायम ठेवल्यास खेडसह इतर तालुक्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. सावधानता म्हणून व्यापा-यांचा माल आणि माणसांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. खेड-दापोली रस्ता बंद करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदी इशारा पातळीवरून वाहात आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सह्याद्रीच्या घाट रांगांमध्ये अतिवृष्टी होत आहे. महाबळेश्वर, पोलादपूर आणि रायगड खोऱ्यातील अतिवृष्टीचा फटका महाड परिसराला बसला. त्यामुळे शहरातील सुकट गल्ली, नाते खिंड, मच्छीमार्केटसह सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. गेले दोन दिवस कुंडलिका नदी सतत इशारा पातळीवर वाहात होती. गुरुवारी तिने धोका पातळी ओलांडली. त्यामुळे कोलाड, गोवे, रोहा शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले. आंबा नदीने सकाळी सहाच्या सुमारास धोका पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठणे शहरातील बस स्थानक, मच्छीमार्केट, बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरले.
कोयना धरण ७७ टक्के भरले
पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना पाणलोटक्षेत्रात गेले नऊ दिवस मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शिवसागर जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने वाढताना सध्या तो ७७ टीएमसीच्या घरात (७५ टक्के) पोहोचला आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजता कोयना शिवसागराचे सर्व सहाही दरवाजे दीड फुटाने उघडून जलविसर्ग करण्यात आला. नद्यांना पूर आला असताना दुसरीकडे पावसाचा जोर कायम असल्याने शासकीय यंत्रणा खबरदारीसाठी कामाला लागली आहे. शिवसागर जलाशयाचे सहा वक्री दरवाजे सायंकाळी चार वाजता दीड फुटांनी उघडून १० हजार क्युसेक पाण्याचा जलविसर्ग सुरू झाला आहे. कण्हेर धरणातून दुपारी १२ वाजता पाच हजार क्युसेकचा जलविसर्ग करण्यात आल्याने कृष्णा-कोयना, पंचगंगा नद्यांच्या जलपातळीत वाढ होऊन या नद्यांना महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून काल १,०५० क्युसेक पाण्याचा कोयना नदीत जलविसर्ग होत असताना त्यात आता आणखी १० हजार क्यूसेक पाण्याची भर पडणार असल्याने कृष्णा, कोयना आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. सांगली, कोल्हापूरला महापुराची तर, कोयनाकाठी पुराची धास्ती वाढली असून, सलग पावसाने पडझड, रस्ते खचणे, बंधारेही वाहून गेले आहेत. सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन केले. धबधबे तसेच नद्यांकाठी जाण्यास तात्पुरती बंदी घातल्याचे सांगितले.
कोयनाकाठ धास्तावला
कोयना धरणातून पाणी सोडल्याने सांगली, कोल्हापूरवर पुराचे संकट घोंघावू लागले आहे. पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग यामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांपाठोपाठ कोयना नदीकाठचे लोकही धास्तावले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्रात नद्यांचे पाणी घुसू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतली नाही तर महापुराचे आस्मानी संकट उद्भवण्याची भीती आहे. सलगच्या पावसाने पडझडीचे सत्र सुरू झाले आहे. घरे, दरडी कोसळण्यासह रस्ते खचणे, बंधारे वाहून जाणे, सखल भागात पाणीच पाणी होणे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरीकडे उपयुक्त पावसाने खरिपाचा पेरा उत्कृष्ठ ठरतो आहे. नद्यांच्या पाणीपातळीत पूरसदृश स्थितीत आणखी झपाट्याने वाढ होताना, जलसाठे झपाट्याने वाढून मजबूत बनत आहेत.