‘पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार’; ९९ टक्के तांत्रिक अडचणी दूर, भूसंपादनाचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावेल- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) तांत्रिक अडचणीचा विषय ९० टक्के मार्गी लागला आहे. गेल्या दोन दिवसात याबाबत बैठका घेतल्या असून भूसंपादनाचा विषय राज्य सरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापावेळी मोहोळ बोलत होते.
मोहोळ म्हणाले, पुरंदर विमानतळासाठी २०१८ मध्ये केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर २०२१ ला जागा बदलण्याचा विचार झाला होता. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, राज्यातील सरकार बदलल्यानंतर पुन्हा पहिल्याच जागेचा प्रस्ताव देण्यात आला. आता राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जात आहे. तूर्त भूसंपादन हा विषय राहिला आहे. विमानतळासाठी ३६ एकर जागा लागणार आहे. भूसंपादनाचे पैसे राज्य सरकारलाही द्यावे लागणार आहे.
पुणे विमानतळाची धावपट्टी वाढवायची असल्याचे सांगून मोहोळ म्हणाले, पुणे विमानतळाचे टर्मीनल सुरू करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएसएफ) मनुष्यबळ गरजेचे आहे. काही दिवसांतच हे टर्मिनल सुरू होणार आहे. देशात सहकार विद्यापीठ करण्याची घोषणा यापूर्वी झाली आहे. मात्र, पुण्यातील वैकुठभाई मेहता संस्थेस सहकार विद्यापीठाचा दर्जा देता येईल का, याची सध्या चर्चा करत आहे. या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार आहे. सहकाराचे राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. पुढील काही दिवसांत राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले जाईल. यामुळे छोट्या छोट्या घटकांना न्याय मिळणार असून त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच पुण्याला मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. चांगल्या टीमसोबत काम करत असताना जबाबदारीची जाणीव आहे. पुण्याला सर्वोत्तम शहर बनवायचे आहे. त्यासाठी काम करायच आहे. संघटनेत काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. विविध विभागाशी संपर्क साधून माहिती घेणार आहे. मागील चार ते पाच दिवसात सहकार विभागासोबत दोन बैठका झाल्या आहेत. सहकार हा शेतकऱ्यांशी थेट जोडला जाणारा विभाग आहे. सहकारात अनेक लोक जोडले जातात. कामासाठी वेळ दिला पाहिजे.
मोदी म्हणाले, क्या, पुणेकर कैसे हो!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी तयारी सुरू होती. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मला शपथ घ्यायची आहे असे सूचवले. त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, क्या, पुणेकर कैसे हो! पंतप्रधानांनी केलेला हा पुणेकरांचा सन्मान म्हणावा लागेल.
अमित शहा कडक हेडमास्तर
प्रथमच मंत्री झाल्याने मला क्रीडा मंत्रालय मिळेल अशी चर्चा होती. अनपेक्षितपणे सहकार मंत्रालयाची जबाबदारी मिळाली. सहकार मंत्रालयासंदर्भात दोन बैठका झाल्या. सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री अमित शहा हे असून त्यांच्याकडे सर्वजण कडक हेडमास्तर म्हणून पाहतात, मीदेखील त्याच नजरेने पाहतो, असेही मोहोळ यांनी सांगितले.