संग्रहित छायाचित्र
पुणे : वैद्यकीय शिक्षण खात्यांतर्गत असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाच्या वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदाचा निकाल लागून सहा महिने झाले तरी उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने उमेदवार हवालदिल झाले असून भरती प्रक्रिया पूर्ण होण्याऱ्या दिरंगाईवर आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
वैद्यकीय शिक्षण खात्यांतर्गत असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयामार्फत वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक या पदासाठी ८३ जागांची २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर दोन महिन्यांनी निकालही प्रसिद्ध केला. निकालात पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली. त्यानंतर या पदासाठी पात्र अपात्र उमेदवारांची अंतिम यादी लावण्यात आली. मात्र काही दिवसातच सरकारी नोकरी मिळेल, अशी उमेदवारांना वाटले होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून नियुक्ती दिली जात नसल्याने उमेदवार वैतागले असुन तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी पात्र उमेदवारांकडून केली जात आहे. नियुक्ती देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु असताना काही मोजक्या उमेदवारांना शैक्षणिक अर्हता धारण करत नाहीत, या कारणाने अपात्र केलेले आहे. त्यामुळे या अपात्र उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) येथे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे याची तपासणी करण्यासाठी नियुक्ती रखडली आहे. परंतु अंतिम निवड यादीत काही उमेदवारांचा या याचिकेशी कोणताही संबंध नाही, त्या पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या देण्यास न्यायालयाने कोणताही स्थगितीचा आदेश दिलेला नाही. अपात्र झालेल्या उमेदवारांचे निकाल राखीव ठेवून निवड यादीतील पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या दिल्यास कोणतीही अडचण नाही. असे पात्र उमेदवारांचे म्हणणे आहे. तसेच नियुक्ती देण्यासाठी सुद्धा न्यायालयाची कोणतीही स्थगिती नाही. जर विभागाने नियुक्ती दिली तर ती अंतिम न्यायनिर्णयाला अधीन राहून असेल असे न्यायालयाने १६ एप्रिल २०२४ रोजीच्या आदेशात नमूद केले आहे. मात्र विभागाकडून नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगितले जावून पात्र उमेदवारांचे नुकसान केले जात आहे. प्रामाणिकपणे अभ्यासकरुन परीक्षेत आपेक्षित यश मिळवून देखील नियुक्ती दिली जात नसल्याने उमेदवार तणावात आहेत. सरकारने याचा विचार संबंधित विभाला नियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. ११ जुन २०२४ रोजी विभागाने यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेतली होती. परंतु अद्याप नियुक्ती देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. असे उमेदवारांनी सीविक मिररला सांगितले.
पदाचे नाव -: समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय)
जाहिरात दिनांक-: १० मे २०२३.
परीक्षा दिनांक-: १६ जुन २०२३.
निकाल दिनांक-: २५ ऑगस्ट २०२३.
कागदपत्र पडताळणी -: १९ ऑक्टोबर २०२३.
पात्र/अपात्र यादी -: ११ जानेवारी २०२४.