‘तो’ आदेश अजित पवार यांचाच
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' (Madam Commissioner)पुस्तकातून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं थेट नाव न घेता गंभीर आरोप केले असतानाच सोमवारी (दि. १६) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी थेट अजित पवारांचे नाव घेतले. अजित पवारांनीच येरवडा पोलीस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत मीरा बोरवणकर म्हणाल्या, ‘‘बिल्डर, पोलीस, नोकरशहा यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळे नागरिकांनाच सतर्क राहावे लागेल. जिथे जिथे प्रायव्हेट बिल्डरला जागा दिली, त्याचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. अजित पवार यांच्यासोबत माझी फक्त एक मीटिंग झाली होती. त्यांना मी ठामपणे म्हणाले की, ‘मी हे करणार नाही.’ माझे आयुक्तपद दोन वर्ष होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मला म्हणाले होते, मला आघाडी धर्म पाळावा लागेल.’’
लिलाव प्रक्रिया योग्य होती, तर त्याआधीचे पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण का केली नाही, असा सवालदेखील बोरवणकर यांनी यावेळी उपस्थित केला. पुस्तक न वाचताच आरोप केले जात आहेत. माझ्या पुस्तकात एकूण ३८ प्रकरणं आहेत. पण केवळ येरवड्याच्या प्रकरणावरच चर्चा होत असल्याची खंतदेखील बोरवणकर यांनी व्यक्त केली.
‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असताना त्यांनी २०१० मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे. पुण्यातील येरवडा कारागृहाशेजारी पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरला दिल्याचा उल्लेख यात आहे. पुस्तकात लिहिलं आहे... ‘‘एके दिवशी मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला. त्यांनी सांगितले की, पुण्याच्या पालकमंत्र्यांना तुम्हाला भेटायचे आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय आहे. मी विभागीय कार्यालयातच पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा त्यांच्याकडे होता. त्यांनी मला सांगितले की, या जागेचा लिलाव झालाय आणि जास्त बोली लावणाऱ्यांसोबत तुम्ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडा. मी नम्रपणे त्यांना म्हणाले, येरवडा हे मध्यवर्ती ठिकाण असून भविष्यात अशी जागा मिळणार नाही. मी नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितले जाईल. मी या गोष्टीला नकार दिल्यानंतर पालकमंत्री यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकावला.’’
दरम्यान या प्रकरणावर तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, ‘‘येरवड्यातील तीन एकर जागेपैकी दोन एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय झाला होता. एक एकर जागेवर पोलीस ठाणे बांधले जाणार होते. सत्यपालसिंह पोलीस आयुक्त असताना हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांची बदली झाली आणि मीरा बोरवणकर आल्या. त्यांनी हे काम करण्यास नकार दिल्याने काम बंद पडले. अजित पवार यांचा या सर्व प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ही सर्व प्रकरणे गृह विभागाशी संबंधित होती. त्यावेळी आर. आर. पाटील गृहमंत्री होते. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी या विषयावर केवळ बैठक घेतली.’’