ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर माजी खासदार सतीश प्रधान यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सतीश प्रधान हे ठाणे शहराचे पहिले महापौर होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी सतीश प्रधान यांची रुग्णालयामध्ये जाऊन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली होती.
कोण होते सतीश प्रधान?
सतीश प्रधान यांचा जन्म २९ ऑगस्ट १९४० झाला होता. ते ठाणे शहराचे माजी महापौर होते. सतीश प्रधान हे ५ जुलै १९९२ ते ४ जुलै १९९८ आणि ५ जुलै १९९८ ते ४ जुलै २००४ या दोन टर्मसाठी महाराष्ट्रातून राज्यसभेचे सदस्य होते. ते शिवसेनेचे होते आणि राज्यसभेतील शिवसेना पक्षाचे नेते होते.
सतीश प्रधान हे ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर होते. शिवसेनेच्या जडणघडणीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सतीश प्रधान यांचा मोठा वाटा होता. त्यांनी ठाणे शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.