सोलापूर-धुळे महामार्गावर ट्रकला भरधाव कारची धडक; चार जणांचा जागीच मृत्यू
एकाच कुटुंबातील चौघांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना सोलापूर-धुळे महामार्गावर घडली आहे. जालना जिल्ह्यातील महाकाल येथे हा भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या महितीनुसार, एकाच कुटुंबातील सदस्य नवीन वर्षाच्या निमित्ताने कारमधून अक्कलकोट वरुन गणपुरला जात होते. दुपारी बाराच्या सुमारास जालना जिल्ह्यातील महाकाल येथे सोलापूर धुळे महामार्गावर उभ्या ट्रकला त्यांच्या कारने पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हे कुटुंब सोलापूर-धुळे महामार्गावरून जात होते. महाकालजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांची कार जोरात आदळली. उपस्थित नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.