संतोष देशमुख हत्याप्रकरण मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलच महागात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हत्येप्रकरणी काल मुख्य आरोपी वाल्मिक कराड स्वतः पोलिसांच्या शरण गेला. त्याच्या या कृत्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. अशातच राजकीय गोटात दुसरी चर्चा सुरु आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाण्याची.
विरोधकांकडून मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीने जोर धरला आहे. तर या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन बाळगले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळं मुंडे यांच्यावर पक्षातीलच वरिष्ठ नेते नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, देशमुख हत्याप्रकरण हे धनंजय मुंडे यांनी व्यवस्थीत हाताळलं नसल्याने वरिष्ठ नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच, या प्रकरणामुळं पक्षाची बदनामी होत असल्याची भावना अनेक नेत्यांमध्ये आहे.
तर राजकीय वर्तुळात अजित पवार सध्या आहेत कुठे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. बहुधा अजित पवार हे परदेशात गेल्याची चर्चा आहे.
तसेच, मुंडे यांच्यावर या प्रकरणी सर्वपक्षीय टीका होत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनीही राष्ट्रवादीची कोंडी केली आहे. मुंडे हे मंत्रिपदावर असतील तर तपास योग्य होणार नाही. यंत्रणेवर दबाव येऊ शकतो, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
तर काही दिवसांपूर्वी, म्हणजेच देशमुख यांच्या हत्येनंतर अजित पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली होती. यावेळी पवार यांनी कुटुंबाला, 'आरोपींना सोडणार नाही, देशमुख कुटुंबाला न्याय देऊ,' अशी ग्वाही दिली होती. याचदरम्यान, गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचे थेट नाव घेऊन राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अजित पवार यांनी गावातून काढता पाय घेतला होता. तेव्हापासून वाल्मिक कराड आणि धनंजय कराड यांच्यावर अजित पवार यांनी मौन बाळगले आहे.
यासर्वामुळं धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असून मंत्रीपद राहत की जात? असा सवाल उपस्थित होत आहे.