संग्रहित छायाचित्र
जुन्नर ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या पिंक पॉलिटिक्सवरून लक्ष्य केले आहे. अजित पवार सध्या गुलाबी रंगाची पुंगी वाजवून विविध सरकारी योजनांचा आवाज काढून मतदारांचा नाग डोलतो का हे चाचपडून पाहात असल्याची टीका अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी येथे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरुवात झाली. यात्रेत पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही सहभाग घेतला असताना सर्वांचे लक्ष जनसन्मान यात्रेतील गुलाबी रंगाची वाहने वेधून घेत होती. या गुलाबी वाहनांच्या माध्यमातून महिला केंद्रीत योजनांची जनजागृती केली जात आहे. अजित पवारांच्या या पिंक पॉलिटिक्सवर आता सर्वत्र टीका होऊ लागली आहे.
अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेला जुन्नर येथे शुक्रवारी सुरुवात झाली. शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांची दुसरी बाजू मांडली. या योजना फक्त दोन महिन्यांपुरत्या असल्याचेही ते म्हणाले. एवढंच नव्हे तर त्यांनी यावेळी अजित पवारांवरही थेट टीका केली. ते म्हणाले, नागपंचमीच्या सणाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही सापाला दूध पाजणं म्हणत नाही. शेतकऱ्यांसाठी हा कृतज्ञतेचा सण आहे. म्हणून आपण नागदेवतेची पूजा करतो. या सणाचं स्वरूप आजकाल नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजवून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झाले आहे. यातील हा फरक समजून घेण्याची गरज आहे. गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे.
महायुती सरकारने गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलाकेंद्रित योजना आणल्या आहेत. तसेच, महिला मतदारांना आकर्षित करण्याकरता विविध कार्यक्रमस्थळी गुलाबी रंगाचा सर्वाधिक वापर केला जात आहे. एवढंच नव्हे तर हल्ली अजित पवार गुलाबी रंगाचे जॅकेट घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या या पिंक पॉलिटिक्सकडे आता सर्वांचं जाणीवपूर्वक लक्ष लागले आहे.
अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेवर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणतात, अजितदादांनी जनसन्मान यात्रेत निर्माण केलेल्या झंजावाताने तुतारी गट बिथरला आहे. गुलाबी रंगाचे वावडे असणाऱ्या खासदाराला स्वतःला गुलाबी रंग लावताना मात्र फार आनंद वाटतो. लोकसभेत थोडे यश काय मिळाले तर हा गडी तर जनतेला “नागोबा” म्हणायला निघाला आहे.