अरेरे... वडील नटसम्राट, लेक नृत्यसम्राट…

मुंबई; प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यातील इतर समारंभाची देशभर प्रचंड चर्चा आहे. रोज नियमितपणे त्यांच्या निवासस्थानी ॲन्टिलियावर किंवा जिओ वर्ल्ड सेंटर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 10 Jul 2024
  • 02:22 pm
Anant Ambani, Tejas Thackeray, Shivsena, BJP

संग्रहित छायाचित्र

अनंत अंबानींच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरेंचा डान्स, शिवसेना, भाजपची व्हायरल व्हीडीओवरून टोलेबाजी

मुंबई; प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यातील इतर समारंभाची देशभर प्रचंड चर्चा आहे. रोज नियमितपणे त्यांच्या निवासस्थानी ॲन्टिलियावर किंवा जिओ वर्ल्ड सेंटर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात येत आहे. त्यामुळे, हे कार्यक्रम चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, सोमवारी (८ जुलै) रात्री झालेल्या संगीत सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. त्यांचा एक व्हीडीओही व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमाला ओरी, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, शिखर पहारिया, वीर पहारिया, तेजस ठाकरे यांनी “ये लडकी है अल्लाह” या गाण्यावर नृत्य केले. या नृत्याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या व्हीडीओच्या माध्यमातून आता राजकीय वादाला फोडणी मिळाली आहे. त्यावरून शिवसेना, भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही ट्विट करत टीका केली आहे. शीतल म्हात्रे यांनी तेजस यांचा डान्स करतानाचा व्हीडीओही पोस्ट केला आहे.

अरे… अंबानींच्या लग्नातला हा बॅकग्राउंड डान्सर ओळखीचा दिसतोय. हे तर टोमणेसम्राटांचे छोटे चिरंजीव, तेजस ठाकरे. उत्तम कला आहे एकेकाजवळ वडील नटसम्राट, लेक नृत्यसम्राट अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.  यावरून भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही... ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत थिरकले नाहीत. जो होळीला “आयना का बायना...” म्हणताना कधी दिसला नाही. “गणा धाव रे… मला पाव रे...” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही... तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…!”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. ते पुढे म्हणाले, “हा भन्नाट नृत्य आविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले. असो... हे नृत्य पण कसे “जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक... वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे “संजयकाका” महाराष्ट्राला पटवून देतीलच…!”

एक नातू ड्रायव्हर, दुसरा नातू…
दरम्यान, नितेश राणे यांनीही तेजस ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नातू अदानीचा ड्रायव्हर होतो. ठाकरेंचा नातू अंबानीच्या लग्नात नाचतो. एक नातू ड्रायव्हर, दुसरा नातू नाच्या. अन् वर परत गुजरात्यांना शिव्या घालायच्या. आता याला 'नाच्या' ठाकरे असे नाव द्यावे, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली होती. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला नेल्यावरून आदित्य ठाकरेंनी सातत्याने सरकारवर तोफ डागली आहे, तर इंडिया आघाडीतील नेतेही संसदेत अंबानी-अदाणी प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरत असतात. एकीकडे राजकीय विरोध दाखवून दुसरीकडे कौटुंबिक नातेसंबंध जपत असल्याची टीका आता उद्धव ठाकरेंवर होऊ लागली आहे. दरम्यान, या व्हायरल व्हीडीओवर अद्यापही ठाकरे गटाची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest