एमपीएससीच्या धोरणावर विद्यार्थ्यांचा संताप, परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यासाठी ५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा ''एक्स'' वॉर
पुणे: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि समाज कल्याण विभाग परीक्षा या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र कोणतीही नियोजित तारीख जाहीर केलेली नसल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या घोषणेकडे लक्ष लागलेले आहे. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गुरुवारी तब्बल ५ हजारहून अधिक विद्यार्थांनी ''एक्स'' वर ताराखा जाहीर करण्यासाठी मोहिम राबविली. तसेच एमपीएससी जर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) प्रत्येक गोष्टींचे अनुकरण करत असेल तर तारखांचे नियोजन का जमत नाही. असाही प्रश्न उपस्थित करुन एमपीएससीच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - २८ एप्रिल २०२४ रोजी आणि समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा-१९ मे, २०२४ रोजी घेण्यात येणार होती. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतूदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल. असे कारण एमपीएससीने घोषणापत्रकात नमूद केले आहे. मात्र पुन्हा परीक्षा कधी घेणार हे सांगितलेले नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोगाने 'एक्स' समाजमाध्यमावर दिली होती. त्यावेळी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने ही परीक्षा पुढे ढकण्यात आली आहे. असे स्पष्ट केले होते. तसेच ही परीक्षा आता २६ मे ऐवजी १६ जून रोजी होणार आहे. असे यूपीएससीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. या सोबतच यूपीएससीकडून घेण्यात येणारी भारतीय वन सेवेची पूर्व परीक्षा देखील लोकसभेच्या निवडणूकीमुळे ढकलण्यात आली आहे. असे जाहीर करुन सोबत ही परीक्षा २६ मे ऐवजी १६ जून रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीने यूपीएससीकडून नियोजन शिकून घ्यावे, असा संतापजनक सल्ला दिला आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलताना परिपत्रकात यथावकाश हा शब्द वापरलेला आहे. कोरोना काळामध्ये देखील परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या गेल्या होत्या. तेव्हा देखील आयोगाने यथावकाश हा शब्द वापरलेला होता. त्यामुळे यथावकाश म्हणजे नेमके काय याचे उत्तर एमपीएससीने द्यावे, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.
मुळातच कोणत्याही पुढील तारखा न देता फक्त पेपर पुढे ढकलण्याचा जो अट्टाहास एमपीएससीकडून केला जात आहे. यामुळे संबंध राज्य भरातील उमेदवार प्रचंड नैराश्यात गेलेले आहेत. कारण, विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करण्यासाठी दरमहा आठ ते दहा हजार रुपये खर्च येत आहे. पुण्यासारख्या शहरात राहून लाखो उमेदवार परीक्षांची तयारी करतात. कोरोना काळात देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने त्यांची खूप हालापेष्टा झालेली होती आणि आता देखील कोणत्याही तारीखा जाहीर न करता परीक्षा पुढे ढकलल्या मुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडताना दिसत आहे. याचा विचार करुन एमपीएससीने तारखा जाहीर कराव्यात. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आर्थिक आणि अभ्यासाचे नियोजन करता येईल.
- राकेश, एमपीएससी विद्यार्थी.
लग्नासाठीच वाढतं वय, मुलींना घरून शिक्षणासाठी मिळणारा अपुरा कालावधी, खर्चाचा प्रश्न अशा अनेक बाबी उमेदवारांच्या जीवनाशी निगडित असताना एमपीएससीकडून याचा कोणताही सारासार विचार होताना दिसून येत नाही. एमपीएससीने आपले उमेदवार वार्यावर सोडलेले आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. केंद्रीय लोकसेवा आयोग आपली परीक्षा पुढे ढकलताना नवीन तारीख देत असेल; तर राज्य लोकसेवा आयोगाला नवीन तारखा देण्यास अडचण काय? नवीन तारखा दिल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर होऊन त्यांचे नैराश्य जाईल व त्यांना नेमकी तयारी करण्यासाठीचे नियोजन आखता येईल; याचा देखील आयोगाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.
- राम, एमपीएससीचा विद्यार्थी.
उमेदवारांचा विचार करुन एमपीएससीने तात्काळ नवीन तारखा जाहीर कराव्यात. अशी सर्वच विद्यार्थ्यांची तीव्र भावना आहे. पुरोगामी महाराष्ट्रात उमेदवारांनी आपल्या न्याय हक्कासाठी नेहमी आंदोलनेच करावीत का ? हाही प्रश्न उभा राहतो. उमेदवारांच्या भावनांचा विचार कोण करणार आहे का. एमपीएससीचा पारदर्शकता पाहता लवकरच तारखा जाहीर कराव्यात.
- मनिषा एमपीएससी विद्यार्थ्यांनी.
आलेले नैराश्य व त्यातून व्यक्त होणाऱ्या तीव्र भावना यांचा विचार राज्य लोकसेवा आयोगाने नक्कीच केला पाहिजे असे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. उमेदवारांचे आयुष्य, वाढते वय, आर्थिक नियोजन, मुलींना शिक्षणासाठी मिळणाऱ्या अपुऱ्या संधी याबाबी आयोगाने विचारात घेऊन तात्काळ नवीन तारखा द्याव्यात. जर केंद्रीय लोकसेवा आयोग नवीन तारखा देऊ शकतो, तर राज्य लोकसेवा आयोग का नाही.
- महेश बडे, समन्वयक- स्टुडंट्स राइट्स असोसिएशन
विद्यार्थ्यांचे म्हणतात...
- एमपीएससीने परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य २०२३ क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्टची तारीख जाहीर करावी.
- सरकारने राज्यसेवा जाहिरातीमध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि संयुक्त गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने एमपीएससीकडे द्याव्यात.
- जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात, पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.
- एमपीएससीने पोलीस उपनिरीक्षक २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी