ललित पाटीलच्या अटकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले....
पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलला (Lalit Patil)अटक करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चेन्नई येथून ताब्यात घेतले. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले असून आता मोठी साखळी बाहेर येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. काही गोष्टी मी आता सांगू शकत नाही मात्र योग्य वेळी मी नक्कीच सांगेन असेही ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
ड्रग्स फ्री महाराष्ट्र ही संकल्पना आम्ही घेऊन आलो आहे. मोठ्या प्रमाणात राज्यात ड्रग्सचे जाळे आहे. ड्रग्सची ही साखळी तोडली पाहीजे. त्यासाठी आम्ही युनिट तयार केले असून हे सगळे कामाला लागले आहेत. याच दरम्यान मुंबई पोलीसांना नाशिकच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी धाड टाकली. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अशी कामे चालतात त्या सर्व ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. आता ललित पाटीलला ताब्यात घेण्यात यश आहे त्यामुळे आता अनेक गोष्टी बाहेर येतील. काही गोष्टी मी आता सांगू शकत नाही मात्र योग्य वेळी मी नक्कीच सांगेन. पण एवढंच सांगते एक मोठी ड्रग्सची साखळी यातून आम्ही बाहेर काढणार आहोत.
View this post on Instagram
पुण्यातील ससून रुग्णालयातून 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा पुणे पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्यानंतर पुणे पोलीसांवर मोठी टीका झाली होती. दरम्यान ललित हा पळाला की पळवला गेला हा सुद्धा मुद्दा यावेळी समोर आला होता. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्य शासनाच्या तसेच प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, आता ललित पाटील यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे मोठी ड्रग्सची साखळी बाहेर येणार आहे आणि अनेक बोलणाऱ्यांची तोडं बंद होणार आहेत.
ससून सर्वोपचार रुग्णालयात उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणाची चौकशी चालू आहे. कोणालाच सोडणार नसून सर्व दोषींवर कारवाई केली जाईल तसेच ससून रुग्णालयावर गुन्हेगारांच्या मुदती वाढवून देण्यात आल्याचा आणि चुकीची प्रमाणपत्रं तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या आरोपांची चौकशी सुरू आहे. कुणालाही सोडणार नाही. असेही फडणवीस म्हणाले आहेत.