संग्रहित छायाचित्र
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने राज्यातील वातावरण तापले. या घटनेमुळे अख्खे बदलापूर रेल्वे रुळावर उतरले आणि त्यांनी सर्वप्रकारची रेल्वे वाहतूक रोखून आरोपीला फाशी देण्याची मागणी लावून धरली. सातत्याने विनवण्या करून, मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही आंदोलक जुमानत नसल्याने अखेर सांयकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत रेल्वेमार्ग मोकळा केला. यावेळी पोलिसांवर दगडफेकही झाली.
दरम्यान, बदलापूर येथील ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेमधील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचं समोर आलंय. याबद्दल थेट शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीच माहिती दिली आहे. बदलापूर घटनेचा तपास करण्यासाठी शिक्षण विभागाने एक विशेष समिति नेमली होती. या समितीने केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबद्दल बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सीसीटीव्ही लावणं हे आवश्यक आहे. या शाळेतील सीसीटीव्ही मधील गेल्या १५ दिवसांचं रेकॉर्डिंग गायब आहे. ते रेकॉर्डिंग का गायब झालं याबाबत पोलिसांनी आवश्यक ती चौकशी करावी अशी शिफारस आम्ही केलेली आहे. १५ दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज आढळलेलं नाही असं अहवालात म्हटलेलं आहे. याची चौकशी पोलिस करतील. केसरकर पुढे म्हणाले, लहान मुलींनी शौचास नेण्याची जबाबदारी दोन सेविकांवर होती. त्या दोघी हजर असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सहआरोपी करावं असं आम्ही सांगितलं आहे. तसंच मुख्याध्यापिकांना 14 तारखेला या घटनेची माहिती होती. त्यांनी ते पोलिसांना कळवलं नाही. त्यांच्यावरही पोक्सोनुसार कारवाई करावी, अशी आम्ही शिफारस केली असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.