संग्रहित छायाचित्र
मुंबई : मालवणातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे देखावा असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाने शिकवले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. शिवरायांनी सुरत लुटलीच नाही, असे फडणवीस म्हणाले.
शिवरायांनी सुरत लुटली नसल्याच्या फडणवीसांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. फडणवीस यांचे गुजरात प्रेम उफाळून आल्याची टीका महाविकास आघाडीकडून केली जाते आहे. खासदार अमोल कोल्हे पोस्टमध्ये म्हणतात, वाटलं होतं जरा विश्रांती घ्यावी… पण इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार.. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर, या बहिणाबाईंच्या ओळी इतिहास बदलू पाहणाऱ्यांनासुद्धा लागू होतील अस वाटलं नव्हतं.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, महाराजांनी सुरत लुटले नाही, चुकीचा इतिहास आहे. हा महाराजांच्या शौर्यावर आक्षेप आहे. हा अक्षम्य गुन्हा आहे. एकदा नाही दोनदा लुटली. फडणवीस महाराजांचा अपमान का केलात.
प्रतीक पाटील म्हणाले, फडणवीस म्हणत आहेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, ही इतिहासाशी लबाडी आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्याही गोर गरिबांना हात न लावता सुरत एकदा नव्हे दोनदा लुटली आहे. फडणवीसांनी असेच बोलत राहावे. विधानसभा निवडणुकीत जनता अजून जोरात भाजपला दणका देईल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचे आंदोलन पूर्णपणे राजकीय आहे. महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेस कुणीही छत्रपती शिवरायांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या एकाही भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान केला. याबद्दल मविआ आणि काँग्रेस माफी मागणार का? मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला, त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला, त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सुरत लुटलीच नाही. विशेष म्हणजे सुरतच्या लोकांनी तेथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. असे असताना काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का? काँग्रेसने सातत्याने शिवरायांचा अपमान केला. आधी त्यांनी देशाची आणि जगभरात जे शिवप्रेमी आहेत त्यांची माफी मागितली पाहिजे.