यावर्षी जपानला शिवनेरीहून शिवज्योत जाणार
जपानमध्ये सत्तर वर्षात पहिल्यांदा शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी केल्यानंतर भारत कल्चरल सोसायटी जपान चे कार्यकर्ते या वर्षीच्या शिवजयंतीच्या जोरदार तयारीला लागले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम, ढोल-ताशा, फेटे बांधणे यांच्या सरावाने जोर धरला आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आणि इतिहासावर आधारित 'शिवचरित्र महानाट्य' स्थानिक कलाकारांकडून सादर केले जाणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीच्या जपानमधील शिवजयंतीचे वैशिष्ट्य ठरणार आहे ते म्हणजे शिवनेरीहून जपानला चाललेली 'शिवज्योत मशाल'. महाराष्ट्रात सर्वत्र पारंपरिक शिवजयंती साजरी करत असताना अनेक संस्था आसपासच्या गडावरून किंवा किल्ल्यावरून मशाल घेऊन येतात. हीच पारंपरिक पद्धत अवलंबून भारत कल्चरल सोसायटी जपान ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे मशालीची विधिवत पूजा करून ती मशाल जपानला घेऊन जात आहेत. याकरिता संस्थेच्या विजय कदम, संजय कागणे, अमित फलके, पद्मनाभ गलगली, निलेश कोद्रे, अंकुश घोलप, कमलेश हांडे, आशुतोष हांडे, शुभम शेटे, विलास बटवाल, अजित बनकर या जपानमधील आणि स्थानिक सदस्यांनी शिवनेरीला भेट दिली.
जपानमधील या शिवजयंती कार्यक्रमाला भारताचे जपानमधील राजदूत श्री. सीबी जॉर्ज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर टोकियोमधील स्थानिक शहरांचे महापौर, जपानमधील विविध भारतीय तसेच जपानी संस्थांचे प्रतिनिधी आणि सुमारे शंभरहून अधिक जपानी पाहुणे छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहायला उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाप्रमाणे शिवजयंती कार्यक्रम पण भव्य-दिव्य व्हावा म्हणून सुमारे १२५ कार्यकर्ते, १०० पेक्षा जास्त कलाकार मेहनत घेत आहेत. भारत कल्चरल सोसायटी जपान ही जपानमधील एक भारतीय सेवाभावी संस्था असून वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सामाजिक सेवा करत असतात. रक्तदान, भारत-जपान संस्कृतीचा मिलाप, सुट्टीच्या दिवशी रस्ते साफ-सफाई करणे, वेगवेगळ्या जपानी सामाजिक संस्थांना कार्यकर्त्यांची गरज असेल तेव्हा ते पुरवणे अशी कामे ही संस्था करत असते.