Eknath Shinde : शिंदेंचे एन्काउंटर करण्याचा होता डाव...; राजकीय वर्तुळात एकच खळबळ

काही जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चकमकीत ठार मारण्याचा डाव रचला होता, असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवारी (दि. ११) एकच खळबळ उडवून दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 12 Oct 2023
  • 11:08 am
Eknath Shinde

शिंदेंचे एन्काउंटर करण्याचा होता डाव...

सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा खळबळजनक आरोप, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रोख

काही जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना चकमकीत ठार मारण्याचा डाव रचला होता, असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad ) यांनी बुधवारी (दि. ११) एकच खळबळ उडवून दिली.  

मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करत असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड यांचा सर्व रोख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून या खळबळजनक आरोपावर  कोणती प्रतिक्रिया दिली जाते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

‘‘एकनाथ शिंदे यांना दुसरे काहीही दिले जाणार नव्हते, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचे एन्काऊंटर केले जाणार होते. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे,’’ असा दावा करीत संजय गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय गायकवाड पुढे म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी शंभुराज देसाई यांच्या घरी बैठक सुरू असताना  ‘मातोश्री’वरून फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचे होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली का?’’ वृत्तसंस्था

संजय राऊत (Sanjay Raut) ही महाराष्ट्राला लागलेली कीड : संजय गायकवाड

संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड असल्याची टीकादेखील संजय गायकवाड यांनी यावेळी केली. ‘‘राऊत यांना मला सांगायचे आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचा जो ललित पाटील सोबत फोटो आहे तो आधी पाहावा. मग उद्धव ठाकरेंचा ललित पाटीलशी संबंध कसा, असा आरोप आम्ही करायचा का,  याचे आधी उत्तर द्या. बिनबुडाचे आरोप करायचे, सरकारला बदनाम करायचे, हा यांचा रोजचा कार्यक्रम झाला आहे. हे कटकारस्थान सरकारला बदनाम करण्यासाठी आहे. याचा आम्ही निषेध करतो. काही हाती लागणार नाही. उलट  तुमच्याच अडचणी वाढतील,’’ असा इशाराही संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाला दिला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest