एमपीएससीचा सावळा गोंधळ; कौशल्य लिपिक टंकलेखन चाचणीमधील खराब 'कि-बोर्डमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट क लिपिक पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी देतान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी त्रासले असताना चाचणी दरम्यान देण्यात आलेल्या खराब कि- बोर्डमुळे विद्यार्थ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चाचणी दरम्यान कि-बोर्डमध्ये अडचणींचा सामाना करावा, त्यांची कौशल्य चाचणी पुन्हा घ्यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे केली आहे. एमपीएससीकडे ही चाचाणी होण्यापूर्वीच कि-बोर्ड चांगले देण्याची मागणी केली होती. परंतु एमपीएससीने दुर्लक्ष करुन नेहमी प्रमाणे सावळा गोंधळ घालून नुकसान केले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क लिपिक पदाची मुंबईतील पवई येथील परिक्षा केंद्रावर १० ते ११ जुलै दरम्यान इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी देत असताना कि-बोर्डमध्ये अडचणी येत होत्या. कि-बोर्डमधील बॅकस्पेस, शिफ्ट कि आणि इतर काही बटणे अडकत होती. स्पेस बटन पुढे जात नव्हते. त्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करावा लागत होता. एमपीएससीच्या नियमावलीनुसार पर्यवेक्षकांना कि-बोर्ड बदलून देण्याची विनंती विद्यार्थ्यांकडून केली जात होती. परंतु त्याकडे परीक्षा पर्यवेक्षकाने लक्ष दिले नाही. तसेच कोणताही प्रतिसाद दिला नाही. कि-बोर्ड बाबत वारंवार विनंती करूनही कि-बोर्डची साधी पाहणी देखील केली नाही. त्या उलट याची तक्रार करायची असेल तर एमपीएससीच्या कार्यालयाकडे करावी, असे सांगितले. मात्र परीक्षेदरम्यान असा प्रकार घडत असल्याने कि-बोर्ड बदलून दिला तर परीक्षा सुरळीतपणे देता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. मात्र प्रतिसाद कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कि-बोर्डच्या खराब बटणांमुळे निर्धारीत वेळत टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवून देखील केवळ खराब कि-बोर्डमुळे हे पद मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. कौशल्या चाचणी परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. कष्ट करुन देखील केवळ परीक्षा आयोजनातील चुकीच्या धोरणामुळे सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण न होण्याची भीती आहे. याचा विचार करुन एमपीएससीने कौशल्य चाचणी पु्न्हा घ्यावी, अशी थेट मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थी म्हणतात..
एमपीएससीकडून दि. १ ते ३ जुलै दरम्यान टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार होती. परंतु. तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा दि. ४ जुलै पासून सुरू झाली. परंतु त्यादिवशीदेखील कि-बोर्डची तांत्रिक अडचण दुर झालेली नसल्यामुळे ४ जुलै रोजी असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर कि-बोर्डबाबतच्या अडचणी लक्षात आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच दि. ५ जुलै पासून ते ९ जुलै पर्यंत परिक्षाकेंद्रावर नवीन कि-बोर्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. पण त्यानंतर नवीन कि-बोर्ड १० जुलै ते १३ जुलै रोजी ३ ऱ्या मजल्यावर घेण्यात येणाऱ्या मराठी टंकलेखन उमेदवारांना देण्यात आले. त्याच दिवशी ४ थ्या मजल्यावर असणाऱ्या इंग्रजी टंकलेखन उमेदवारांना अॅसेरचे जूने कि-बोर्ड देण्यात आले. हे कि-बोर्ड योग्यप्रकारे चालत नव्हते. यातील बटणे खराब होती. कि-बोर्ड व्यवस्थित कार्य करीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी बदलून देण्याची विनंती केली. पण एमपीएससीकडून नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी कि-बोर्ड बदलून देण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित कालावधीत पूर्ण चाचणी पूर्ण करता आली नाही. खराब कि- बोर्ड देणे म्हणजे हा एकप्रकारचा अन्याय आहे. याबाबत एमपीएससकडे तक्रारी केली आहे.
परंतु आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांनी कोणाताही प्रतिसाद दिलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासुन टंकलेखन परिक्षेची तयारी करीत असुन अशाप्रकारे आमच्यावर अन्याय झाल्याने पद मिळणार नाही, सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. एमपीएससीने योग्य तो समानतेचा न्याय द्यावा आणि टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी सीविक मिररशी बोलताना केली .
टीसीएस कंपनीला काळ्या यादीत टाका...
एमपीएससीच्या गट क लिपीक पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याची जबाबदारी टीसीएस कंपनीला देण्यात आली आहे. खासगी कंपनीकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याची आपेक्षा होती. परंतु कंपनीने जूने कि-बोर्ड वापरुन विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. परीक्षेपूर्वी कंपनीने सर्व कि-बोर्डची तपासणी करणे आपेक्षित होते. तसेच चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास कि- बोर्ड बदलून देण्याची व्यवस्था करणे बंधनकारक होते. परंतु असे काही न करता जबाबदारी ढकलून विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे यां कंपनीला काळ्या यादीत टाकावे. अशीही संतापजनक मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
एमपीएससीकडे ही कौशल्य चाचणी होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी चांगले कि- बोर्ड देण्याची मागणी केली होती. परंतु एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. तसेच कंपनीच्या हिताचा विचार केला. विद्यार्थ्यांचे नुकसान करुन कंपनीच्या हित साधणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन कंपनीला काळ्या यादीत टाकावे.
- स्वप्नील, विद्यार्थी.