'महाराष्ट्र राज्य तेलुगु साहित्य अकादमी'वर ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांची निवड
मुंबई : राज्य सरकारने 'महाराष्ट्र राज्य तेलुगु साहित्य अकादमी'ची स्थापना केली असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, त्यात ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांच्यासह अकरा सदस्यांची निवड करण्यात आलीय.
या साहित्य अकादमीत सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असून सांस्कृतिक कार्य खात्याचे अप्पर मुख्य सचिव, उपसचिव, संचालक आणि सहसंचालक हे शासकीय सदस्य आहेत. याशिवाय सर्वश्री डॉ. पी.व्ही. रमणा यांची कार्याध्यक्षपदी, तर जगनबाबू गंजी ठाणे, अशोक कांटे मुंबई, संगेवानी रवी मुंबई, गुंडेरी श्रीनिवास ठाणे, हरीश केंची पुणे, रविना चव्हाण पुणे, रेणुका बुधारम सोलापूर, गजानन बेजंकीवार यवतमाळ, श्रीनिवास कंदुकुरी बल्लारपुर, सतीश कनकम, चंद्रपूर यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षासाठी असेल. यावेळी सांस्कृतिक कार्य खात्याचे संचालक सचिन निंबाळकर यांनी अकादमी स्थापन करण्यामागची भूमिका विशद केली. तेलुगू भाषेचे जतन, संवर्धन, प्रसार, प्रचार मोठ्या प्रमाणात व्हावा. तेलुगू - मराठी भाषिक, साहित्यिक आदान - प्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागावी या हेतूने 'महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी' स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अकादमीच्या वतीने एक लाख रुपयाचा जीवनगौरव पुरस्कार, स्वतंत्र आणि भाषांतरीत साहित्य प्रकाशित करण्यासाठी अर्थसहाय्य आणि पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती निंबाळकर यांनी दिली.
महाराष्ट्राच्या जडण घडणीत तेलुगू भाषिकांचा खूप मोठा वाटा आहे. मुंबईच्या उभारणीत, उद्योगधंद्यात, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान आहे. मुंबईतल्या अनेक ऐतिहासिक इमारती तेलुगु भाषिकांनी उभारल्या असल्याचे स्व. मनोहर कदम यांच्या 'मुंबईच्या जडण घडणीत तेलुगू भाषिकांचा सहभाग'' या पुस्तकात म्हटले आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून अनेक समाज सुधारकांच्या चळवळीत, स्वातंत्र्य लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही अनेक तेलुगु भाषिकांचा सहभाग होता. तेलुगू आणि मराठी भाषेचे पुरातन कालपासून सांस्कृतिक संबंध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू तंजावरचे राजे सरफोजीराजे भोसले यांनी अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या, कविता मराठीत आणि तेलुगु भाषेमध्ये लिहून साहित्य समृद्ध केलेले आहे. बालगंधर्वांनी सादर केलेली अनेक नाटके तेलुगू भाषांतर करून ती सादर झालेली आहेत. तेलुगू अकादमी स्थापन केल्याने महाराष्ट्रातल्या आणि तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यातल्या साहित्य परिषद सारख्या संस्थांची, तेलुगु आणि मराठी भाषिकांच्या विचारांची देवाण घेवाण, आदान प्रदान करण्यात ही अकादमी सहाय्यभूत ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांचे आभार मानण्यात आले.