सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडन्या विक्रीस
सावकाराचे कर्ज (Lender's Loan) फेडण्यासाठी नांदेडमधील (Nanded) एका महिलेने स्वत:सह कुटुंबातील पाच किडन्या विकायला (Kidney) काढल्या आहेत. जिल्हातील मुदखेड तालुक्यातील वाईवरदड येथील महिला शेतकरी सत्यभामा बालाजी कुंचलवार यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी घर सोडले. मात्र, सावकाराचा जाच कमी झाला नाही. त्यामुळे सत्यभामा यांनी स्वत:सह आपल्या कुटुंबातील पाच किडन्या विकणार असल्याचे बॅनर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावले आहे. नांदेडमध्ये या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू असून, सावकारी कर्जाचा फास दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे विदारक चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच भिंतीवर हे बॅनर लावण्यात आले आहे. खासगी सावकाराच्या दहशतीने सत्यभामा यांना कुटुंबीयांसह वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची मागणीही केली आहे.
सत्यभामा यांच्या कुटुंबात पती, दोन मुले आणि एक मुलगी असे एकूण पाच सदस्य आहेत. मोठा मुलगा दहावी, दुसरा मुलगा सातवी तर, मुलगी पाचवीपर्यंत शिकले आहेत. वाईवरदड येथे त्यांची सात एकर शेती आहे. ‘‘तीन वर्षापूर्वी आम्ही मुदखेडच्या खासगी सावकाराकडून दोन लाख रूपये कर्ज घेतले होते. दरम्यानच्या काळात आम्ही काही पैसे फेडले. परंतु, कोविड महामारीतील लॉकडाऊन काळात सर्वच ठप्प होते. त्यातच शेतीतूनही फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड आम्ही वेळेत करू शकलो wनाही,’’ असे सत्यभामा यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी सत्यभामा यांचे पती बालाजी कुंचलवार यांना साप चावला होता. त्यांच्या उपचारासाठी सत्यभामा यांनी स्थानिक सावकाराकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. नंतर त्यांनी अनेक वेळा पैसे फेडले. परंतु व्याजाच्या पैशासाठी सावकारांनी पतीला बेदम मारहाण केली. त्याचवेळी सत्यभामा यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी सृष्टी यांनी ३ जुलै २०२१ रोजी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून सावकारावर कारवाई करा किंवा त्याला इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी केली. मात्र, तरीही सावकारावर कोणतीही कारवाई झाली नाही.
‘‘सावकारचे पैसे देणे आमचे काम आहे. मरण्यापेक्षा एक किडनी विकून आम्ही सर्वजण एका किडनीवर जगू. मला माझ्या मुलांना शिकवायचे आहे. कुटुंबात पाच जण आहेत. त्यापैकी ज्यांची किडनी ज्या रुग्णाला फिट बसेल, ती विकायची आहे. त्या पैशातून सावकाराचे पैसे द्यायचे आहेत. आम्ही सावकाराच्या भीतीमुळे गाव सोडले असून जीव मुठीत धरून राहात आहोत,’’ असेही असे सत्यभामा यांनी सांगितले.