सुरमणी पंडित अनंत केमकर यांचे दुःखद निधन
किराणा घराण्याचा संगीत वारसा जोपासणारे ज्येष्ठ संगीतकार आणि हार्मोनियम वादक अनंत केमकर यांचे वृद्धापकाळाने 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
भारतीय शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्य यांची उत्तम जाण असणाऱ्या जुन्या पिढीपैकी ते एक कलाकार होते. ते भारतातील अग्रगण्य हार्मोनियम वादक होते. अनेक नामवंत संगीत दिग्दर्शक, कलाकार यांच्यासोबत त्यांनी हार्मोनियमची साथ संगत केली. तसेच संगीत दिग्दर्शनही केले.
हिराबाई बडोदेकर , श्री नारायण जी व्यास यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांनी पी मधुकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. पुढे जाऊन त्यांनी देश विदेशात भारतीय शास्त्रीय संगीत मैफिलिंचे अनेक कार्यक्रम केले. त्यांचा जन्म पुण्यात झाला व ते पुढे संगीत क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आले. त्यांनी आपला कलेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अनेक उत्तम शिष्य वर्गही तयार केला.
आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांचे नियमित कार्यक्रम होत असत. “साद सुरांची साथ अनंताची” हे त्यांचे आत्मचरित्र पर पुस्तकही प्रकाशित झाले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताचा वसा कायम ठेवला विशेष म्हणजे त्यांच्यासाठी सेवेत असणाऱ्या रुग्णसेवकालाही महिन्याभरात उत्तम उत्तम गाणी तसेच राष्ट्रीय गीत शिकवले. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे नुकताच त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी व रसिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.