Maratha Reservation : सोशल मीडियावरही मराठा आरक्षणाची धग
सरकारला दिलेली मुदत संपल्यामुळे बुधवारपासून (दि. २५) पुढील आदेश येईपर्यंत तसेच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी घालावी या मनोज जरांगे-पाटील यांच्या (Manoj Jarange-Patil) आवाहनाला महाराष्ट्रातील विविध गावामधून पाठिंबा मिळत आहे.
याचेच पडसाद म्हणून की काय महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरही 'भावपूर्ण श्रद्धांजली' असा कमेंट्सचा पूर सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सेना नेते रामदास कदम, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांसारख्या मातब्बर मराठा राजकीय नेत्यांच्या सभेला तसेच त्यांच्या सर्व राजकीय पोस्टवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' अशा कमेंट सोशल मीडियावर दिसत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले व संभाजीराजे छत्रपती यांनाही मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका व्यक्त करण्याविषयी सोशल मीडियामधून विचारणा होत आहेत. मराठा समाजासह धनगर आणि ओबीसी समाजानेही आक्रमक पवित्रा घेत आपल्या प्रमुख मागण्या सरकारपुढे सादर केल्या आहेत. यामुळे विविध समाजमाध्यमातूनही सर्व समाज आपल्या मागण्या तसेच आरक्षणाचा लढा मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेंड तसेच पोस्टद्वारे लक्ष वेधून घेत आहेत.