मानहानी प्रकरणी राऊत, ठाकरे अडचणीत
खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या बदनामी प्रकरणी 'सामना' (Samana)चे मालक व शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संपादक खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा दोषमुक्त करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असून या दोघांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. मानहानी प्रकरणी आम्हाला दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज त्यांनी न्यायालयाकडे सादर केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत स्थानिक न्यायालयाने या दोघांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
खासदार राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा केलेला अर्ज माझगाव महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. त्यामुळे या दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. माझ्या अशिलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांच्या याचिकेतून मान्य करण्यात आले आहे, पण ते कृत्य आम्ही केलेले नाही तर आमच्या वृत्तपत्राचे जे सहसंपादक अतुल जोशी आहेत ते या बातमीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना विरोधातील अब्रुनुकसानीच्या खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे, अशी मागणी यातून केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रकरणावरील निकालानुसार या दोघांना जबाबदारी टाळता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मधील एका खटल्याचा निकाल रद्द करून २०१३ मध्ये त्यावर पुन्हा निकाल दिला.
यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, कोणत्याही वृत्तपत्राचे मालक-संपादक प्रत्येक छापून येणाऱ्या गोष्टीसाठी जाबबदार असतील. ही जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. तीच बाब उद्धव ठाकरेंबाबत लागू होते. त्यानुसार, उद्धव ठाकरे मालक आणि मुख्य संपादकही आहेत, असेही शेवाळेंच्या वकिलांनी सांगितले.
जबाबदारी टाळता येणार नाही
ठाकरे हे सामनाचे मालक, संपादक आहेत. त्यामुळे वृत्तपत्रात छापून आलेल्या मजकुराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडते. राऊत हे पगारी नोकर म्हणजेच संपादक आहेत. त्यांनाही जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांनी अतुल जोशींना जरी पुढे केले तरी तो चुकीचा न्याय ठरेल. मग आमच्या अशिलाने जायचे कुठे ? कारण यामध्ये आमच्या अशिलाचे म्हणजेच राहुल शेवाळे यांच्या प्रतिमेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असा युक्तिवाद आम्ही न्यायालयात केला आहे. तो मान्य करून न्यायालयाने दोघांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे.