File Photo
आदित्य ठाकरे किल्ल्यावर आधी आल्याने नारायण राणे यांना पोलिसांनी अडवले. यामुळे राणे समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. समर्थकांनी पोलिसांविरोधात निदर्शने केली. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आम्हाला आत जाऊ द्या अशी मागणी केली असतानाही पोलिसांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही.
दुसरीकडे आदित्य ठाकरेही आम्ही मुख्य रस्त्यानेच बाहेर जाणार असल्याच्या मागणीवर अडून बसले. पुढच्या १५ मिनिटांत मुख्य मार्ग मोकळा केला तर आम्ही जाऊ, असं आदित्य ठाकरेंच्या समर्थकांनी म्हटलं. मुख्य रस्ता सोडून जाण्यास नारायण राणे यांनी नकार दिला.
परिणामी राजकोट किल्ल्यावर प्रचंड राडा झाला. यावेळी नारायण राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. ते म्हणाले की, पोलिसांना त्यांना (महाविकास आघाडीला) सहकार्य करायचं असेल तर करा. यापुढे आमच्या जिल्ह्यात तुम्हाला असहकार्य असेल. तुम्ही त्यांना येऊ द्या. तुम्ही त्यांना आमच्या अंगावरून जायला परवानगी द्या. मी बघतो. घरात घुसून एक-एकाला रात्रभर मारून टाकीन. सोडणार नाही.
राणेंची बोलण्याची पद्धतच तशी - फडणवीस
मालवणमध्ये नारायण राणे यांनी पत्रकार आणि पोलिसांना धमक्या दिल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे विचारले असता ते म्हणाले, नारायण राणे यांची बोलण्याची पद्धत तशी आहे. ते आक्रमकपणे बोलतात पण त्यांना धमकी द्यायची असेल, असे मला वाटत नाही. कोणी काय केले, त्यावर आज बोलणार नाही.
माझी सगळ्यांनाच विनंती आणि सूचना आहे की, त्यांनी राजकारण करू नये. मालवणच्या घटनेवर कुणीच राजकारण करू नये. नौदलाने ही बाब गांभीर्याने घेतली असून चौकशी समिती तयार केली आहे. समितीने पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली आहे. नौदल दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई करेल. विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण करू नये.