संग्रहित छायाचित्र
जालना जिल्ह्यातील (Maratha Andolan) आंतरवली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्लान शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रचला होता, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानकडून (devendra fadanavis pratisthan) शनिवारी (दि. ७) करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीवरून अवघे राज्य ढवळून निघाले होते. पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीमार केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती, तर आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीमार केला, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानने या घटनेवरून राजेश टोपेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी राजेश टोपे यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणीही प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे.
पोलिसांवर दगडफेक करण्याचा आधीपासूनच प्लान करण्यात आला होता, असा आरोप करून देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसाराम डोंगरे म्हणाले, ‘‘आंदोलनात गडबड झाल्यास पोलिसांवर दगडफेक करण्याचा राजेश टोपे आणि त्यांच्या स्वीय सहायकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्लान होता. याबाबत प्रतिष्ठानकडून जालना पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले आहे.’’
‘‘१ सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवांचे उपोषण चालू होते. तेथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या पोलीस बंदोबस्तामध्ये काही समाजकंटक आणि जातीवादी लोक बाहेर गावावरून आले होते. ते शहागड आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. या समाजकंटकांनी पोलीस बांधवांवर जाऊन दगडफेक केली. यामुळे आंदोलन चिघळले आणि नाईलाजास्तव पोलिसांना लाठीचार्ज, अश्रुधुरांचा मारा करावा लागला,’’ असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानने म्हटले आहे.
२७ ऑगस्ट रोजी आमदार राजेश टोपे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अंकुश सहकारी साखर कारखाना येथे एक गुप्त बैठक झाली होती, असा दावादेखील देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानने पोलिसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे टोपे आणि त्यांचे स्वीय सहायक, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलीस तसेच सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.