संग्रहित छायाचित्र
मुंबई: मराठवाडा आणि विदर्भात सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, त्यांना जेवढ्या लवकर नुकसानभरपाईची रक्कम देता येईल ते पहावे आणि शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावे, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केले आहे.
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. कित्येक पिके अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. उभे असलेले पीक डोळ्यासमोर नष्ट होणे आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणे कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसानभरपाईची रक्कम देता येईल ते पहावे आणि सरकारने शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मराठवाड्याला सलग पाचव्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार माजला आहे. नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला आहे. तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसानभरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.