संग्रहित छायाचित्र
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेला लैंगिक अत्याचार आणि त्याविरोधात मंगळवारी झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारीही तीव्रपणे पडत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनीही सरकारला धारेवर धरले आहे.
राज ठाकरे म्हणाले, मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना करवत नाही. आज सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे. तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का?, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्र डागलं.
ते म्हणाले, जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचे, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचा हा हलगर्जीपणा?