संग्रहित छायाचित्र
मुंबई : राज्यातील अनेक भागात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात मुसळधार पाऊस पडणार असून तेथे रेड अलर्ट दिला आहे.
विदर्भाकडे पाठ फिरवलेला मोसमी पाऊस पुन्हा एकदा विदर्भात सक्रिय झाला आहे. २१ जुलै दरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूरसह कोकण आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील दृश्यमानतेवर याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. या घाट क्षेत्रामध्ये मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते अगदी कोकण पट्ट्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची प्रणाली निर्माण आहे. या प्रणालीअंतर्गत हा कमी दाबाचा पट्टा या भागांकडे सरकताना दिसणार आहे. त्यामुळे २१ जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपरनगरांसह घाटमाथ्यावरील परिसरामध्ये भर दिवसा काळ्या ढगांची दाटी झाल्याचे पाहायला घाटातून प्रवास करणाऱ्यांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरही आवश्यकता असेल तर प्रवास करावा, तसेच आवश्यक दक्षता घ्यावी असेही कळवले आहे.