संग्रहित छायाचित्र
बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याच्या घटनेवर सगळ्या राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र याप्रकरणी मंगळवारी बदलापूरमध्ये झालेले आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते असा आरोप केला आहे. तसेच छोट्या मुलींवर झालेल्या अन्यायाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, मंगळवारच्या आंदोलनामुळे लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होतं. मंगळवारी झालेलं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होतं. इतक्या जलदगतीने गाड्या भरून बाहेरून लोक आले. आंदोलकांना मंत्र्यांनी समजावलं, सगळ्या मागण्या मान्य केल्या, तरीही ते माघार घेत नव्हते. त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. राजकारण करायला अनेक मुद्दे आहेत. लहान मुलीचे राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
बदलापूरमधील आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटांवर मोजण्याइतके होते असे सांगून ते म्हणाले, इतर ठिकाणांहून गाड्या भरुन लोक आणण्यात आले होते. मंत्री महोदयांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या तरीही ते हटत नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे. रेल्वे रोको करणं हे मोठं नुकसान आहे. आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. एका दिवसात लाडकी बहीण योजनेचे बोर्ड छापता येतात का? आमच्या बहिणींना सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना पाठिशी घालणार नाही. विरोधकांना माझं इतकंच सांगणं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ हा आंदोलनातून दिसला.