संग्रहित छायाचित्र
अंतरवाली सराटी: मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांची ताकद राज्यात दिसली. मराठवाड्यात रावसाहेब दानवे तसेच पंकजा मुंडे हे भाजपचे मातब्बर उमेदवार पाडण्यात 'जरांगे फॅक्टर' निर्णयाक ठरला. मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागातही या फॅक्टरचा महायुतीला बसला. लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी पाटलांनी कंबर कसली आहे.
मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आजवर उपोषण करणारे जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागांवर उमेदवार देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. चारही पक्षातल्या तिकीट न मिळालेल्या उमेदवारांना जरांगे संधी देणार आहेत. मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, जलसिंचनाचे प्रश्न हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य भाग असेल. मुस्लिम समाजाला आरक्षण आणि धनगर समाजाचा आरक्षण हा ही प्रचाराचा मुद्दा असेल. निवडून आल्यावर हे आरक्षण देण्याचे आश्वासन जरांगे यांनी दिले आहे. मराठवाडा हा जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण, त्यांनी पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईत मेळावे घेणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.