आता शब्द पाळा अन्यथा..., जरांगे पाटलांचा इशारा
मराठा आरक्षण (Maratha Reservation) लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) वाटपावरुन शासन-प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्यानंतर सरकारला जाग आली असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तत्काळ प्रमाणपत्र वाटप करा, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान प्रमाणपत्र वाटप करण्याचा आदेश दिला खरा पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
महाराष्ट्र सरकारकडून राज्यभरात मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, अशी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील येत्या २० जानेवारीपासून अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला आंदोलनासाठी निघणार आहेत. ते २६ जानेवारीला मुंबईत दाखल होतील. मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन होणार आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज शौनिक यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबीर आयोजित करुन ५४ लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, असा आदेश त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशानंतरही मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलन करण्याचा निर्णय बदलतील, अशी सरकारला आशा आहे. वृत्तसंस्था
‘प्रमाणपत्रही २० जानेवारीच्या आत हवीत
“त्या आदेशाची अंमलबजावणी होणार का? आतापर्यंत खूप आदेश झाले. आम्हाला ५४ लाख मराठ्यांना २० जानेवारीच्या आत प्रमाणपत्र द्या, असे आदेश काढून त्याची अंमलबजावणी होणार असेल तर बघावे लागेल. पण प्रमाणपत्र २० जानेवारीच्या आत दिले तर पाहू, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे. नुसता आदेश काढून चार-दोन लोकांना वाटलेले आम्हाला मान्य नाही. आता मराठा फसणार नाही. वेळप्रसंगी माझा सरकारने जीव घेतला तरी मी तयार आहे. विशेष बाब करण्याचा सरकारला अधिकार आहे. मागील दोन महिन्यात तुम्ही काही केले नाही. ही तुमची चूक आहे. विशेष बाब करून २० जानेवारीच्या आत हे करा. गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे, असेही मनोज जरांगे यांनी ठणकावले आहे.