संग्रहित छायाचित्र
मुंबई: राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप आणखी चिघळला आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक निष्फळ झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कृती समितीनं हा संप सुरुच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.
ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी संप मागे घेण्याची विनंती उदय सामंत यांनी घेतली होती. मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. आज (४ सप्टेंबर) संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री या संपाबाबत काय भूमिका घेणार? मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संपावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गोपिचंद पडाळकर आणि सदाभाऊ खोत या सत्ताधारी आमदारांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे. या नेत्यांच्या संघटना देखील संपात उतरणार आहेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
या आहेत एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्या
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे.कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत. घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी. २०१५-२०२० या कालावधीसाठी जाहीर केलेल्या रुपये ४८४९ कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी. सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट ५ हजार रुपयांची वाढ करावी. आयुर्मान संपलेल्या बसेस वापरातून काढून घ्याव्यात व स्वमालकीच्या एस.टी. बस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच मनुष्यबळही उपलब्ध करून द्यावे.
संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं- गुणरत्न सदावर्ते
जे लोक आंदोलन करत आहेत, ते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. काही बोटावर मोजण्याइतके आणि एसटीमधून निलंबित करण्यात आलेले लोक आंदोलन करत आहेत. नोकरीवर असताना प्रदीर्घ काळ रजा घेऊन मजा मारणारी ही लोक आहेत, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. ज्या कृती समितीने या आंदोलनाची हाक दिली आहे, ती कृती समिती नाही, कीडे समिती आहे. हे लोक पाच टक्के मलाई खाणारे लोक आहेत. यांनी लिहून देताना, धरणे आंदोलन करत असल्याचे लिहून दिले आहे. मात्र, एसटीतील कष्टकऱ्यांना संप करण्यास सांगण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर उठलेली ही बांडगुळं आहेत, अशी टीकाही सदावर्ते यांनी केली. आम्ही आंदोलन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातव्या वेतन आयोगाबाबत विचार करण्यास सांगितले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्या मेळाव्यालाच त्याची कार्यवाही पूर्ण केली होती. मात्र, कृती समितीने अडचणी आणून ती होऊ दिली नाही. कारण त्यांना बीओटी तत्वावरील करारातील पाच टक्के मलाई खायची होती, असा आरोपही त्यांनी केला.