हमीभाव नाही, तर मत नाही; राज्य सरकारला 'या' नेत्याने दिला घरचा आहेर
नवी मुंबई : ‘एक क्विंटल कापसाचे (Cotton) उत्पादन करण्यासाठी सुमारे १० हजार रुपये खर्च येतो; मात्र पिकवलेल्या कापसाला शेतकऱ्यांच्या हाती केवळ सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. राज्यात कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरावर पाटी लावून त्यावर शेतमालाला भाव नाही, तर तुम्हाला माझे मत नाही, असे लिहा; राजकारणी कसे सरळ होतील ते बघा’, असा घरचा आहेर राज्य सरकारला प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिला.
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रविवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी नेरूळ येथील रामलीला मैदानात अभंग सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बच्चू कडू म्हणाले, ‘आजची तरुणाई रॉक, पॉप आणि डीजेच्या तालावर नाचते, थिरकते. साने गुरुजींनी म्हटले आहे की, आजच्या तरुणाईच्या ओठावर कोणते गाणे आहे, त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. अभंग रिपोस्ट बँड यांनी मोठ्या ताकदीने आणि मजबुतीने रिमिक्स संगीताच्या माध्यमातून तयार केलेले १५० वर्षांपूर्वीचे अभंग आजच्या तरुणांच्या ओठावर येतील यात शंका नाही. अभंग रिपोस्ट टीमने केलेली मेहनत वाया जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी अभंग रिपोस्ट टीमने ‘लाकडाचा देव त्याला अग्नीचे भेव, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव’ हा अभंग सादर केला. त्यावरून ‘राजकारण्यांचा देव त्याला मतदाराचे भेव’ अशी कोटी करून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा
प्रमुख शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खानदेशात सध्या कापूस, सोयाबीन व मका या शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. दरम्यान एमएसपीपेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत.