Gadkari revealed the name of the future guardian minister of Nagpur in a program
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. त्यानंतर खाते वाटप करण्यात आले. मात्र अद्याप पालकमंत्रीपदाबाबत कोणाची घोषणा झालेली नाही. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पालकमंत्री पदाबाबत महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणतीही अद्याप घोषणा केलेली नाही. दरम्यान गडकरी यांनी एका कार्यक्रमात नागपूरच्या होणाऱ्या पालकमंत्र्यांचे नाव उघड केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखां जाहिर करताना नकळतपण गडकरी नागपूरचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुठे यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, केलेलं वक्तव्य लक्षात येताच गडकरी यांनी आपला शब्द फिरवला, याबाबत अद्याप घोषणा झाली नसल्याचे यावेळी स्पष्ट केलं. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अशातच काल बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. नवी दिल्ली येथे घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. मात्र, गडकरी यांचे हे वक्तव्य आणि मोदींची भेट हा योगायोग कसा काय ? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
मंत्र्यांना खाती वाटप करतानाही प्रतीक्षा करावी लागली. आता निकाल लागल्यानंतर साधारण दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असून राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नावांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं नेत्यांना पालकमंत्र्यांच्या पदाचीही वाट पाहावी लागणार.