संग्रहित छायाचित्र
मुंबई : बदलापूर येथे दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने पुन्हा एकदा महिला व लहान मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. बदलापूरच्या नामांकित शाळेतील स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने राजकीय वर्तुळासह मनोरंजनविश्वातील कलाकारांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बदलापूरमधील बातमी शेअर करत प्रिया बापट लिहिते, माझं रक्त खवळतंय, आता ही कोणा एकाची लढाई नाही. याठिकाणी स्त्रिया व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रसाद ओकने याप्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा असे इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्री शिवाली परबने, हँग द रेपिस्ट…, अशी पोस्ट शेअर करत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी असं म्हटलं आहे. अभिजीत केळकरने याप्रकरणी, जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे…त्याला शिक्षा तरी मानवी का असावी? असा प्रश्न पोस्ट उपस्थित केला आहे. यापूर्वी, अभिज्ञा भावे, ओंकार राऊत, क्षितीज पटवर्धन, ऐश्वर्या नारकर, क्षितीजा घोसाळकर, सिद्धार्थ चांदेकर यांनी देखील कोलकाता बलात्कार प्रकरणी संतापजनक पोस्ट शेअर करत गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती.
या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश दिले आहेत.