संग्रहित छायाचित्र
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ पासूनच लागू केला जाणार आहे. अशी माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता वर्णनात्मक पॅटर्नची तयारी सुरु करावी लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
एमपीएससीकडून परीक्षांचे निकाल लावण्यास दिरंगाई होत आहे. तसेच परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ लागू होण्याची शक्यता कमी आहे. हा पॅटर्न लागू करण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवली जाऊ शकते. अशी चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रंगली आहे. यामुळे राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रामाचे वातावरण होते. त्यामुळे एका विद्यार्थ्यांने माहिती अधिकारातून ही माहिती एमपीएससीला विचारली होती. त्यावर एमपीएससीने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला आहे.
राज्येसवा परीक्षेसंबंधी वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेबद्दल वर्णनात्मक पॅटर्न बद्दल जो संभ्रम व अफवा पसरवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी मागील बऱ्याच काळापासून या पद्धतीने अभ्यास करत आहेत. त्यांच्या मनात वर्णनात्मक परीक्षेबाबत भीती देखील होती. त्यामुळे पॅटर्न बदलला नाही, सध्याची अभ्यासाची पध्दत बदलण्याची आवश्यकता नाही. मात्र वर्णनात्मक पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांनी लिखाणानाचा सराव करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, यासाठी काही विद्यार्थ्यांनी मिळून एमपीएससीला माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली असता, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीनेच होत असून २३ फेब्रुवारी २०२३ ला जो निर्णय घेतला आहे. तोच निर्णय लागू असणार आहे, यानिर्णयामध्ये बदल करण्यासंबंधी आयोगाचा कुठलाही मानस नाही असे उत्तर एमपीएससीने दिले आहे.
सोशल माध्यमांवर पसरत असणाऱ्या अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. आता ही माहिती समोर आल्याने एकदाचा ताण मिटला आहे. यामुळे आता वर्णनात्मक पॅटर्ननुसार तयारी करण्यास सुरवात करणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. फक्त एमपीएससीने दिलेल्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा.
- प्रिया, विद्यार्थीनी.
औरंगाबाद खंडपीठामध्ये एमपीएससीचे शपथपत्र...
औरंगाबाद खंडपीठामध्ये ज्या वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या होत्या त्यामध्ये आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये सुद्धा वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून लागू करण्यासंबंधी बाब अधोरेखित केली आहे. आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारा वेळ ही बाब लक्षात घेऊनच निर्णय २०२५ पासून लागू करण्यासंबंधी आयोगाने निर्णय घेतला ही बाब नमूद केलेली आहे. महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य होतं की ज्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होत होती. भारतातील इतर सर्व राज्यांमध्ये ही परीक्षा वर्णनात्मक लेखी पद्धतीनेच होते. ही बाब सुद्धा आयोगाने यामध्ये नमूद केलेली आहे. २०२४ मध्ये होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असणार आहे.