संग्रहित छायाचित्र
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) समाज कल्याण विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षा आज रविवारी (दि.१९) होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आता या परीक्षेचाच एमपीएससीला पडला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. गेल्या एक वर्षापासून या परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
एसईबीसी आरक्षणाचे कारण देत या परीक्षेसह राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आरक्षणाचा प्रश्न मिटला असल्याने राज्यसेवेची एमपीएससीने नव्याने तारीख जाहीख केली आहे. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेल्या पीएसआय मैदानी चाचणीची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे समाज कल्याण आणि इतर मागास बहुजन कल्याण या विभागाच्या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे विद्यार्थ्यांना वाटत होते. परुंतु परीक्षा पुढे ढकलून दोन महिने होत आले तरी परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याने विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत.
समाज कल्याण विभागाच्या रिक्त पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात १५ मे २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानंतर ही परीक्षा ५ ते १५ जून २०२३ या दरम्यान होईल असे सांगण्यात आले होते. मात्र १ वर्षानंतरही या परीक्षेची तारीख होत नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एमपीएससीने समाज कल्याण विभागा आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परीक्षा देखील १९ मे रोजी घेतली जाणार असल्याचे घोषणापत्रात नमूद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आरक्षणाचे कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे. समाज कल्याण विभागाची जाहीरात तब्बल १२ वर्षांनी आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी विशेष तयारी केली आहे. मात्र परीक्षाच होत नसल्याने विद्यार्थी तणावाखाली आहेत. त्यामुळे एमपीएससीने या परीक्षेची तारीख तात्कळ जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचार संहितेचा फटका या परीक्षेला बसला आहे. आगामी काळात विधान सभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पु्न्हा आचार संहितेचा फटका बसू नये, योग्य नियोजन करुन एमपीएससीने ही परीक्षा घ्यावी. असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
एमीपएससीने समाज कल्याण विभागाच्या परीक्षेबाबत खूपच हलगर्जीपणा केलेला आहे. एक वर्ष झाले तरी परीक्षा होत नाही, ही एमपीएससीसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी किती काळ परीक्षेच्या तारखेची वाट पाहत होते. नोकर भरतीत वेळ जात असून दुसरीकडे विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. एमपीएससीने तत्काळ तारीख जाहीर करावी.
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
इन्फो बॉक्स..
१५ मे २०२३ रोजी परीक्षेची जाहिरात केली होती प्रसिध्द
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ -४१ जागा
समाज कल्याण अधिकारी गट ब - २२ जागा
गृहप्रमुख गट ब - १८ जागा
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब - ३१ जागा