एमपीएसीने 'यथावकाश' , ''लवकरच'' या शब्दांचे अर्थ समजून सांगावेत   १२ वर्षांनी होणाऱ्या परीक्षेला मुहुर्त तरी कधी ..?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) (MPSC) कडून समाज कल्याण विभागाच्या रिक्त पदांसाठी तब्बल १२ नोकर भरतीची जाहिरात १५ मे २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC

संग्रहीत छायाचित्र

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ; तर पीएसआय मैदानी चाचणीवरुन उमेदवारांचा संताप

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) (MPSC) कडून समाज कल्याण विभागाच्या रिक्त पदांसाठी तब्बल १२ नोकर भरतीची जाहिरात १५ मे २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ५ ते १५ जून २०२३ या दरम्यान होईल असे सांगण्यात आले होते. मात्र या परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला जात नसल्याने तारीख लांबली होती. विद्यार्थ्यांनी अनेकवेळा विनंती अर्ज केल्यानंतर एमपीएससीने अभ्यासक्रम जाहीर केला. मात्र त्यानंतर उदासीन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर १९ मे ही तारीख जाहीर केली. मात्र त्यानंतर आरक्षणाचे कारण देत एमपीएससीने ही तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता  १२ वर्षांनी होणाऱ्या परीक्षेला मुहुर्त तरी कधी लागणार असा प्रश्न उपस्थित करुन एमपीएससीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्य सेवा परीक्षेची तारीख पुढे ढकल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. 

एमपीएससीकडून गेल्या एक ते दीड वर्षापासून परीक्षांचे नियोजन योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून येत आहे. एक ते दोन वर्षांहून अधिक काळ भरती प्रक्रिया सुरु असल्याने परीक्षांचे तयारी करणारे उमेदवार त्रासले आहेत. या परीक्षेची तारीख जाहीर कधी होणार याची माहिती एमपीएससीकडून दिली जात नाही. त्यात आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन एमपीएससीने राज्य प्रशासनाकडे बोट दाखवून हात वर केले आहेत. त्यामुळे आता याची जबाबदारी घेत राज्य प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.   

''लवकरच'' सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करणार होती एमपीएससी...

  सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिध्द केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता सात ते आठ दिवस होऊन देखील लवकरच या शब्दाचा विचार करुन सुधारित तारखा जाहीर केल्या नाहीत.  यापूर्वी एमपीएससीने 'यथावकाश' हा शब्द प्रयोग केला होता. त्यामुळे याचा नेमका अर्थ काय असाही प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता ''लवकरच'' हा शब्द प्रयोग करुन विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.

या परीक्षा पुढे ढकलल्या...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करिता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्यात येणार होती. परंतु, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अंमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या दिनांक २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच दिनांक १९ मे, २०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

इन्फ बॉक्स                                    

 समाज कल्याण अधिकारी गट ब  - जाहिरातीतील जागा : २२

रिक्त जागा - ३०

मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब -जाहिरातीतील जागा : ३१

 रिक्त जागा  -३८

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, ब आणि गृहप्रमुख गट ब या पदांच्या ८१ रिक्त जागांसाठी नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल १२ वर्षांनी या विभागातील रिक्त पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. अर्ज भरुन एक वर्ष १५ मे रोजी होतील. जर अशी भरती प्रक्रिया वर्षानुवर्षे चालणार असेल विद्यार्थ्यांनी आयुष्यभर अभ्यासच करावा का. ? 

 - प्रशांत- स्पर्धा परीक्षार्थी.

पीएसआयचे उमेदवार संतापले...

 एमपीएससीकडून पोलीस उपनिरीक्षक यापदाची भरती प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मैदानी चाचणी होईल, असे वाटत होते. एमपीएससीने मैदानी चाचणीची तारीख देखील जाहीर केली होती. दोन वेळा तारखा पुढे ढकलल्या. त्यानंतर चाचणी होईल असे वाटत असतानाच पुन्हा एमपीएससीने लोकसभा निवडणुकीचे कारण देत पुढची तारीख न देता मैदानी चाचणी पुढे ढकलली. यावर उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. एमपीएससीच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. आता मैदानी चाचणी ही निवडणूकीचा निकाल लागताच तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वी घेण्यात यावी, अशी मागणी उमेदावारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest