अमोल अवचिते
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या कर सहायक या पदासाठी केवळ दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ या उमेदवारांना कौशल्य चाचणीमध्ये सूट आहे. परंतु एमपीएससीने पदवीधर अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त या उमेदवारांना सुध्दा सूट गृहीत धरण्यात आले होते. तसेच ज्यांच्याकडे टायपींगचे प्रमाणपत्र नसताना देखील अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेस पात्र केले होते. त्यानंतर आता एमपीएससीने या उमेदवारांना कौशल्य चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे एमपीएससीचा गोंधळ सुरुच असून यावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अशा उमेदवारांनी अपात्र करुन पुन्हा निकाल लावण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
एमपीएससीने दिव्यांग, माजीसैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही. असे १५ एप्रिल २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत झालेली चुक एमपीएससीच्या लक्षात आणून दिली. याबाबतचे वृत्त सीविक मिररने प्रसिद्ध देखील केले होते. त्यानंतर एमपीएससीने पुन्हा १० जून रोजी प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करुन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी या प्रवर्गातील उमेदवारांना कर सहायक संवर्गासाठी मराठी व इंग्रजी भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य राहिल. असे नमूद केले आहे. यामुळे जे उमेदवार पात्र नसताना देखील त्यांनी निवड करण्यात आली आहे. त्याबाबत एमपीएससीने पुन्हा विचार करावा, आणि सुधारित निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (MPSC News)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या कर सहायक मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल जाहीर करताना ज्या उमेदवारांन अर्ज केलाच नव्हता त्यांची नावे आल्याचे समोर आले होते. तसेच एकही प्रमाणपत्र नसणारे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कर सहायकसाठी हे आरक्षण लागू नसतानाही त्यांना स्थान मिळाले. एक प्रमाणपत्र उमेदवारांना करसहायकसाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक तरी ही पात्र केले आहे. त्यामुळे पुन्हा निकाल लावण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. परंतु त्याकडे एमपीएससीने दुर्लक्ष केले आहे.
एमपीएससीने जाहीर केलेला निकाल हा नियमानुसार लावला असल्याचे प्रसिध्दी पत्रक जाहीर केले होते. मात्र त्यानंतर आता पुन्हा प्रसिध्दीपत्रकात नियम बदलल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नियमामध्ये बदल केला आहे तर मग निकाल देखिल याच नियमाप्रमाणे असला पाहिजे असे आता विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वित्त विभागाकडून माहिती अधिकाराद्वारे सुद्धा माहितीमध्ये पदवीधर अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त या उमेदवारांना कर सहायक साठी सूट नाही असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळेच एमपीएससीने यु टर्न घेत १० जून रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पदवीधर अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त या उमेदवारांना कौशल्य चाचणी देणे बंधनकारक आहे. परंतु निकाल सुधारित केला नाही. जे उमेदवार पात्रच नव्हते ते उमेदवार निकालात आलेच कसे हा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
एमपीएससी सोयीनुसार नियमांचा अर्थ काढून निकाल लावत आहे. तोंडावर पडले की पुन्हा नियमांची आठवण होत आहे. भरती प्रक्रियेत वारंवार चुका होत असल्याचे दिसून येत आहे. एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना नियमावलीची आपुरी माहिती असल्याचे दिसून येत आहे. एमपीएससीने अशा प्रकारच्या चुका केल्या आहेत. मात्र चुकीच्या पद्धतीने जाहीर केलेला निकाल रेटून नेण्याचा प्रकार केला जात आहे.
- आजम शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते