MPSC News: एमपीएससीने अपात्र खेळाडू उमेदवारांना केले पात्र!

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ब परीक्षेतील पदासाठी खेळाडूने सादर केलेले प्रमाणपत्र लागू होत नाही. असे त्या उमेदवाराचे नाव जाहीर करुन सांगितले होते. मात्र याच घोषणेचा विसर एमपीएससीला पडला असून पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

MPSC News

संग्रहित छायाचित्र

एमपीएससीला पडला स्वत:च प्रसिध्द केलेल्या घोषणापत्राचा विसर

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ब परीक्षेतील पदासाठी खेळाडूने सादर केलेले प्रमाणपत्र लागू होत नाही. असे त्या उमेदवाराचे नाव जाहीर करुन सांगितले होते. मात्र याच घोषणेचा विसर एमपीएससीला पडला असून पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (पीएसआय) २०२१ या पदाच्या तात्पुरत्या निवड यादीत पुन्हा त्याच उमेदवाराची निवड केल्याचे समोर आले आहे. तसेच खेळाडू प्रमाणपत्र बोगस निघाल्याने राज्यकर निरीक्षक पदासाठी निवड रद्द झालेल्या याच उमेदवाराची पुन्हा त्याच पदासाठी निवड केली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या कारभारावर उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. तसेच एमपीएससी डोळे झाकून काम करत असल्याचा उमेदवारांनी आरोप केला आहे. 

एमपीएससीकडून (MPSC) २०२२ मध्ये पीएसआयच्या ३७८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली होती. या परीक्षेची तात्पुरती निवड यादी गेल्या आठवड्यात एमपीएससीने जाहीर केली आहे. ३७८ पदापैकी २० पदे ही खेळाडूपदासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ज्या खेळात खेळाडूंनी प्राविण्य मिळविलेले आहे, त्या खेळाचे प्रमाणपत्र एमपीएससीने जाहीर केलेल्या खेळांच्या यादीमध्ये बसते. असे खेळाडू ते प्रमाणपत्र सादर करुन खेळाडू या आरक्षणाचा फायदा घेतात. खेळाडू आणि सर्वसाधारण उमेदवार यांच्या गुणांमध्ये बरीच तफावत असते, तसेच स्पर्धा कमी असते. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी बोगस खेळाडू प्रमाणपत्र काढल्याचे समोर आले होते. तसेच सेवेत दाखल झालेल्या उमेदवारांकडे देखील बोगस प्रमाणपत्र असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार राज्य सरकारने त्यांच्यावर अन्याय होऊ नये, तसेच त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रमाणपत्रे सादर करुन माफी मागण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणानंतर खऱ्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यानंतर ज्या खेळाडूंनी प्रमाणपत्र सादर केले आहे, त्याची कठोर तपासणी केली जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु याचाच विसर एमपीएसससीला पडला असल्याचे दिसून येत आहे.

पीएसआयच्या यादीमध्ये निवड झालेल्या खेळाडू उमेदवारांच्या यादीमध्ये दोन ते तीन उमेदवार हे पात्र नसताना देखील त्यांची निवड केली आहे. पीएसआय हे पद गट ब चे पद आहे. असे असताना देखील क व ड गटातील पदांसाठी लागू असलेले खेळाडूचे प्रमाणपत्र सादर करुन खेळाडू आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या उमेदवारांची एमपीएससीने निवड केली आहे. त्यांची नावे स्वत: एमपीएससीने जाहीर केली होती. तरी सुध्दा पुन्हा त्याच खेळाडू उमेदवारांची नावे पीएसआय पदाच्या तात्पुरत्या निवड यादीत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे केल्यामुळे एमपीएससीतील अधिकाऱ्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. एमपीएससीकडून वारंवार निकालामध्ये गोंधळ घातला जात आहे. परंतु याची जबाबदारी एमपीएससीचे अध्यक्ष, सचिव घेत नसल्याचे दिसून येत आहे. एमपीएससीतील घोळाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता सचिव आणि अध्यक्षही प्रतिसाद देत नाहीत. 

एका उमेदवार हा गट क साठी पात्र असून पण २०२१ च्या पीएसआय गट ब साठी त्याची निवड करण्यात आली आहे. क्रीडा विभागाने जे प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत, त्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. तसेच ते उमेदवार अजूनही परीक्षा देत आहेत. जो खेळ ५ टक्के आरक्षणात नाहीत. ते देखील विविध पदावर निवडले गेले आहेत. या मुळे खऱ्या खेळाडूंवर अन्याय होत आहे.
-  सोनल फरांडे (वुशू राष्ट्रीय खेळाडू)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या  राज्यकर निरीक्षक २०२१ परीक्षेमध्ये एका खेळाडूची खेळाडू कोट्यातून निवड झाली. आणि नंतर असे समजले की त्याचे कराटे स्पर्धेतील प्रमाणपत्र हे पडताळणी मध्ये रद्द  झाले.  या कारणास्तव त्याची नियुक्ती रद्द केली होती. याच परीक्षेत मी  प्रतीक्षा यादीमध्ये होतो. प्रतीक्षा यादीच्या अंतिम तारखेपूर्वी त्या जागेची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. माझे नुकसान झाले. जर आयोगाने पूर्व परीक्षेआधीच खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी करून घेतल्यास कोणाचेही नुकसान झाले नसते, माझी एमपीएससीला विनंती आहे की, ह्या प्रक्रियेमध्ये काही बदल करावा जेणेकरून  प्रामाणिक  खेळाडूंचे नुकसान होणार नाही.
-  शुभम पाटील, राष्ट्रीय खो खो खेळाडू 

एमपीएससीने खेळाडू उमेदवारांचे प्रमाणपत्र पडताळणी स्वतः करायला हवेत. ज्यावेळी हे उमेदवार पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतात तेव्हाच पण  जर आयोगाने अस केलं नाही तर पुढे सुद्धा अश्याच प्रकारे अस्सल खेळाडूंच्या हक्कावर दरोडे बोगस प्रमाणपत्रधारक टाकत राहतील.
- आजम शेख , माहिती अधिकार कार्यकर्ते

एमपीएससीने  खेळाडू प्रोफाईलमध्ये बदल करावा. कारण जे गट ब पदासाठी पात्र नाही ते खेळाडू पण परीक्षेचा अर्ज भरताना खेळाडू प्रोफाईल ए, बी, सी, डी  पात्र असे नमूद करतात. यामुळे ग्रुप ए मधील पात्र खेळाडूंचे नुकसान होत आहे.
- मयूर विधाते- राष्ट्रीय खेळाडू (तलवारबाजी)

उमेदवार म्हणतात.. 

- एका उमेदवाराचे क्रीडा प्रमाणपत्र २०२० ला रद्द केले आहे,  तरीही एमपीएससीने त्याची शिफारस केली आहे.

- यात एमपीएससीतील काही अधिकारी या प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.

- औरंगाबाद विभागाने बोगस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे

- बोगस ड्रॅगन बोट गेम प्रमाणपत्र धारण करून काही उमेदवार एमपीएससीची फसवणूक करत आहेत.

- आयोगाची कागदपत्र पडताळणी करायची जबाबदारी नसली तरी सबंधित विभागाशी बोलुन, तपासणी करायला हवी. 

- घटनात्मक दर्जा असलेल्या एमपीएससीकडून निकालात कोणतीही चुक होणे अपेक्षीत नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest