MPSC : एमपीएससीचा अंधाधुंदी कारभार; प्रक्रियेनुसार निकाल लावण्याचा पडला विसर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन (एमपीएससी) (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा अंतिम निकाल लावण्यापूर्वी काही नियमावली आखण्यात आली आहे. निकालाची प्रक्रिया देखील जाहीरातीत नमूद करण्यात आली आहे.

MPSC

एमपीएससीचा अंधाधुंदी कारभार; प्रक्रियेनुसार निकाल लावण्याचा पडला विसर

अध्यक्षांना अंधारात ठेवून निकाल जाहीर केल्याचा उमेदवारांचा आरोप

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन (एमपीएससी) (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा अंतिम निकाल लावण्यापूर्वी काही नियमावली आखण्यात आली आहे. निकालाची प्रक्रिया देखील जाहीरातीत नमूद करण्यात आली आहे. मात्र याच नियमांना तिलांजली लावत निकालातील पसंतीक्रम हा घटक वगळून थेट शिफारपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामुळे हा एमपीएससीचा अंधाधुंदी कारभार असून मनमानी पध्दतीने काम केले जात असून उमेदवारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. 

एमपीएससीकडून विविध परीक्षांचा निकाल लावताना नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. त्यात एमपीएससी ही विश्वासू परीक्षा घेणारी संस्था असल्याने कोणत्याही प्रकारची चूक आपेक्षित नाही. कारण एका निर्णयामुळे उमेदवारांच्या आयुष्यांचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. मात्र हीच चूक आयोगीतील महत्वाच्या पदावर बसलेल्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने केली असल्याचा आरोप उमेदवारांनी केला असून संताप व्यक्त केला आहे. निकाल लावण्यापूर्वी प्रक्रियाच समजून घेतली नसून एमपीएससीच्या अध्यक्षांना अंधारात ठेवून निकाल लावला आहे काय ? असाही असा संतापजनक प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक - मुद्रांक निरीक्षक, राज्यकर निरीक्षक , सहायक कक्ष अधिकारी गट ब या पदांसाठी एमपीएससीकडून भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.  या पदांसाठीची गुणवत्ता यादी, पसंती क्रम, तात्पुरती निवड यादी ऑटींग आऊट आणि त्यानंतर अंतिम शिफारस यादी अशी निकाल लावण्याची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक होते. मात्र असे न करता थेट निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे तीनशे उमेदवारांची नोकरी मिळण्याची संधी हुकणार आहे. अशी खंत उमेदवारांनी सीविक मिररशी बोलताना व्यक्त केली. 

एमपीएससीकडून चारही पदांसाठी एकच पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक पदानुसार वेगवेगळा निकाल लावण्यात आला. त्यानंतर मुख्यपरीक्षा वेगवेगळी होईल असे उमेदवारांना वाटले होते. २०२१-२२ मध्ये एमपीएससीने प्रत्येक पदासाठी वेगवेगळी मुख्यपरीक्षा घेतली होती. मात्र त्यानंतर आता असेच आपेक्षित असताना एमपीएससीने या निर्णयात बदल करुन सर्व पदांसाठी एकच मुख्य परीक्षा घेवून वेळ वाचवाला. त्यामुळे उमदेवारांना दिलासा मिळाला. निकाल वेळेत लागेल आणि नोकरी लवकर मिळेल अशी आपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र एमपीएससीने निकाल प्रक्रियेचे उल्लंघन करुन उमेदवारांना मोठा धक्का दिला आहे. पसंती क्रम दिला असता तर चार पदापैंकी एका पदाची उमेदवाराने निवड केली असती. उरलेल्या तीन पदांसाठी इतरांना संधी मिळाली असती. एकाला एका वेळी एकच पद मिळावे, भरती प्रक्रिया सुरळीत आणि लवकर पार पडावी यासाठी एमपीएससीने पसंतीक्रम हा पर्याय दिला आहे. 

ऑप्टींग आऊटमुळे २०२१-२२ मध्ये काळा बाजार झाला होता. प्रतिक्षा यादीत असलेल्या उमेदवारांकडून त्याच्यापुढे असलेल्या उमेदवाराला ऑप्टींग आऊट वापरुन पद सोडण्यासाठी किंवा पद सोडतो, असे सांगून पैसे देण्याची, घेण्याची प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत म्हणून यंदापासून पंसतीक्रम हा प्रर्याय नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार हा पर्याय या चारही पदांसाठी लागू होईल असे जाहीरातीत नमूद केले आहे. मात्र आता थेट शिफारस यादी लावण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीनेच नियमाचे उल्लंघन केले आहे. असा आरोप उमेदवारांनी केला असून याचा उमेदवारांना मोठा फटका बसणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.   

    

 उमेदवार म्हणतात.. 

- २० जानेवारी २०२३ महाराष्ट्र गट ब व गट क पूर्व परीक्षा जाहिरात २०२३ प्रसिध्द 

(पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक - मुद्रांक निरीक्षक, राज्यकर निरीक्षक , सहायक कक्ष अधिकारी गट ब या पदांसाठी)

- प्रत्येक पदाचा स्वतंत्र पूर्व परीक्षा निकाल ऑगस्टमध्ये केला जाहीर

- संयुक्त मुख्य परीक्षा गट ब २०२३ जाहिरात १५ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध

- गट ब संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ( पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक - मुद्रांक निरीक्षक, राज्यकर निरीक्षक , सहायक कक्ष अधिकारी) या पदांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडली.

- मुख्य परीक्षा जाहिरातीमध्ये ११.२ मुद्द्यात पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक-मुद्रांक निरीक्षक, राज्यकर निरीक्षक , सहायक कक्ष अधिकारी या पदांच्या मुख्य परीक्षा गुणाच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. आणि 11.2  मुद्या नुसार पसंतीक्रम देण्यात येईल. असे नमूद केलेले आहे.

- त्यानंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि ऑपटींग आऊट (पर्याय रद्द करण्याचा निर्णय)  पर्याय देण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे.

- परंतु एकच मुख्य परीक्षा घेऊन देखील पसंतीक्रम न देता स्वतंत्र संवर्ग निहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे.

- ज्यामुळे चारही पदांसाठी पात्र ठरलेले उमेदवार निवड यादीमध्ये दिसत आहेत.

- यामधून ऑपटींग आऊटचा काळा बाजार करण्याऱ्या काही समाजद्रोहींना संधी मिळत आहे.

- पसंतीक्रम नियमात असताना निकाल लावताना याचा नेमका विसर कसा पडला ?

यापदांसाठी राबविण्यात आली भरती प्रक्रिया.. 

राज्य कर निरीक्षक - १५९ 

दुय्यम निरीक्षक- मुद्रांक निरीक्षक - ४९

सहायक कक्ष अधिकारी - १६४

पोलीस उपन निरीक्षक - ३७४ 

गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर पदासाठी पसंती क्रम आणि त्यानंतर ऑप्टींग आऊट असा निकाल लावण्याचा नियम देण्यात आला आहे. मात्र या नियमाचे उल्लंघन एमपीएससीने केल्याचे दिसून येत आहे. जाहिरातीमध्ये दिलेले नियमच एमपीएससी कशी विसरु शकते हे समजत नाही. यामुळे एमपीएससीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्व लिखित नियम जर पाळले जात नसतील तर आयोगावर विश्वास ठेवायचा कसा ? असा प्रश्न उमेदवारांना पडलेला आहे.

  - आजम शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते. 

सचिवांनी बोलणे टाळले...

 परीक्षेच्या निकालाबाबत विचारण्यासाठी एमपीएससीचे सचिव यांना फोन केला असता, त्यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी काही न बोलता थेट फोन बंद करुन टाकला. असाच अनुभव देखील उमेदवारांना येत असल्याचे उमेदवारांनी सीविक मिररला सांगितले. तसेच सचिवांना जबाबदारी पेलवत नसेल तर त्यांना पुन्हा मंत्रालयात पाठवावे, अशी मागणीही उमेदवारांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest