एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्या, पण तारखा नाही सांगितल्या

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे.

संग्रहित छायाचित्र

युपीएससी पुढे ढकलेल्या परीक्षांची तारीख सांगू शकते तर एमपीएससी का नाही ; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा संतापजनक सवाल

अमोल अवचिते 

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे. मात्र परीक्षा पुन्हा कधी घेणार याची तारीख जाहीर केली नसल्यामुळे स्पर्धी परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तसेच माजी सनदी अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतूदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल. असे कारण एमपीएससीने घोषणापत्रकात नमूद केले आहे. मात्र पुन्हा परीक्षा कधी घेणार हे सांगितलेले नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोगाने 'एक्स' समाजमाध्यमावर दिली होती. त्यावेळी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने ही परीक्षा पुढे ढकण्यात आली आहे. असे स्पष्ट केले होते. तसचे ही परीक्षा आता २६ मे ऐवजी १६ जून रोजी होणार आहे. असे यूपीएससीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. यूपीएससीने तारीख पुढे ढकल्याचे कारण देवून तारीखही जाहीर केली. तर मग एमपीएससीला एवढे तंतोतंत काम करणे का शक्य होत नाही. असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जाऊ लागला असून संताप व्यक्त केला जात आहे. 

परीक्षांच्या नियोजनाची मुख्य जबाबदारी ही  एमपीएससीच्या सचिवाची असते. सचिवांनी पुढाकार घेवून नियोजन करणे आपेक्षित आहे. मात्र रोजचा दिवस पुढे ढकलायचा एवढाच कारभार सध्या एमपीएससीच्या कार्यालयात सुरु आहे. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.  तसेच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा या निगरगट्ट अधिकाऱ्यांना काहीही देणे घेणे पडलेले नाही. त्यामुळे अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून त्यांना सेवेत पु्न्हा कधी घेणार याची कोणतीही तारीख देऊ नये. म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांची अवस्था समजेल, असा संताप विद्यार्थ्यांनी सीविक मिररशी बोलताना व्यक्त केला.

या तारखांना होणार होत्या परीक्षा 

- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - २८ एप्रिल २०२४ रोजी

- समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा - १९ मे, २०२४ रोजी 

जग सोशल मीडियाच्या पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगतात आले आहे. तंत्रज्ञान इतकं फास्ट झाला आहे, तरीही या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा वेळेवर रिझल्ट लागत नाही आणि वेळेवर तारखा जाहीर करत नाही. कोडगी व्यवस्था ! दुर्दैव! 
- अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

एमपीएससी विध्यार्थीच्या आयुष्यशी खेळत आहे. लोकसभा निवडणूक समोर ठेऊन एमपीएससीला वेळापत्रक जाहीर करता आले असते. आणि विद्यार्थींना मनस्ताप झाला नसता. विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात. एमपीएससी विद्यार्थींचा अंत पाहत आहे. 
- राहुल माने, स्पर्धा परीक्षार्थी

परीक्षांचा तारखा पुढे ढकलल्या जातील याची कल्पना विद्यार्थ्यांना होती. यूपीएससीने तत्काळ विद्यार्थ्यांचा विचार करुन नवीन वेळापत्रक जाहीरे केले. त्यानंतर एमपीएससीच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र यूपीएससीच्या घोषणेनंतर एमपीएससीने दोन ते तीन दिवसांचा वेळ घेतला पण नवीन तारखा जाहीर केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आयोगाने लवकरात लवकर परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करता येईल.
- नितीन आंधळे - स्पर्धा परीक्षार्थी

एमपीएससीचा प्रत्येक वेळेचा घोळ आहे. प्रामाणिकपणा, वेळेवर परीक्षा घेणे, निकाल लावणे हा प्रकार एमपीएससीच्या अधिकाऱ्यामंमध्ये नाही. युपीएससी जर वेळेवर निकाल लावते, विद्यार्थ्यांना वेळोवेळो सूचना देत असते, तर ते एमपीएससीला का जमत नाही. कितीतरी विद्यार्थ्यांनी केवळ निकाल वेळेवर लागत नाही म्हणून एमपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास करणे सोडून दिले आहे.
- प्रशांत कोळी, स्पर्धी परीक्षार्थी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest