एमपीएससीला अखेर आली जाग ; पण सोयीनुसार झोपलेले अधिकारी झाले जागे; रखडलेल्या परीक्षांबाबतची दिली माहिती, त्यात दोन पदांची दिली खोटी माहिती, उमेदवारांचा आरोप
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा दीड ते दोन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. काही परीक्षांची जाहीरात प्रसिध्द झाली आहे, मात्र अभ्यासक्रमच जाहीर केला नाही. तसेच जाहीरात प्रसिध्द करुन परीक्षेची तारीख प्रसिध्द केली नाही. निकालामध्ये चुका केल्या. उमेदवारांना उध्दट उत्तरे देणे असे प्रकार एमपीएससीत सुरु होते. त्यामुळे झोपेचे सोंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी सीविक मिररने सर्वप्रथम आवाज उठवला होता. त्यानंतर झोपलेले अधिकारी जागे झाले अन् कार्यालयात पुन्हा कामाकाजाची धावपळ सुरु झाली. ते काम पूर्ण झाल्यानंतर एमपीएससीने अखेर या परीक्षांबाबत खुलासा केला आहे. मात्र त्यातही दोन पदांबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
एमपीएससीकडून गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा आणि निकाल जाहीर केले जात होते. मात्र त्यानंतर अलीकडच्या काही दिवसांपासून झोपलेल्या अधिकाऱ्यांमुळे एमपीएससीच्या कारभाराला मरगळ आली होती. तसेच कामकाज रामभरोसे सुरु होते. त्यावर सीविक मिररने आवाज उठवत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून कोणत्या परीक्षा रखडल्या आहेत. निकाल किती दिवसांपासून रखडले आहेत. मुलाखती का रखडल्या आहेत. तसेच निकाल का जाहीर केला जात नाही. याची सविस्तर माहिती गोळा केली. त्यानंतर सविस्तर वृत्त प्रकाशीत केले. त्यानंतर एमपीएससीला खाडकन जाग आली. मिररने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जून्या फाईलांवरील धूळ झकटण्यात आली. त्यानंतर एमपीएससीने एक - एक प्रश्नाचे उत्तर तयार करून घोषणापत्रकाद्वारे खुलासा दिला आहे. मात्र त्यातही एमपीएससीने चूक केल्याचे विद्यार्थ्यांनी समोर आणले आहे.
''एमपीएससीचा अंदाधुंद कारभार'', ''एमपीएससीचा उदासीन कारभार, विद्यार्थी नैराश्यात'', ''निकालाबाबत एमपीएससीची टाळाटाळ'', या मथळ्याखाली वेळोवेळी वृत्त प्रकाशीत करुन मिररने एमपीएससीच्या कारभारावर लक्ष वेधले आहे. त्यानंतर देखील एमपीएससीचे सचिव आणि अध्यक्षांनी कोणताही खुलासा केला नव्हता. शासन आदेशानुसार एमपीएससीने वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी खुलासा करणे बंधनकारक आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविली होती. त्यावेळी देखील मिररने "एमपीएससीने दाखवली शासन आदेशाला केराची टोपली" या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत करुन या शासन आदेशाची आठवण करुन दिली होती. त्याची दखल घेत एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे. मात्र हा खुलासा देखील सोयीनुसार लावल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
----
एमपीएससीचा खुलासा..
अभ्यासक्रमा बाबत..
- अधीक्षक व तत्सम पदे सामान्य आयोगाकडून सदर पदासाठी अभ्यासक्रम राज्यसेवा , गट ब ( प्रशासक ) जाहिरात क्र . ९ ० / २०२२ या परीक्षेचा अभ्यासक्रम - २१ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध
- कनिष्ठ वैज्ञानिक, गट ब आणि सहायक व भूवैज्ञानिक, गट ब - या पदासाठी अभ्यासक्रम २७.०७.२०२३ रोजी प्रसिद्ध
- सहायक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि अधिव्याख्याता, गट ब - या पदाचा अभ्यासक्रम तयार असून, मान्यतेबाबतची कार्यवाही सुरु आहे
निकालासंदर्भात--
- न्यायिक सेवा -२०२३- न्यायालयांत प्रकरणे दाखल असून स्थगिती असल्याने अंतिम निकाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- सहाय्यक आयुक्त, बीएमसी- न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु आहे.
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंड अधिकारी , गट अ २०२२ ( पूर्व परीक्षा )- १२.०३.२०२४ रोजी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. न्यायालयांत प्रकरणे दाखल असून अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल .
- पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा - २०२३- न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु आहे.
- दंतशल्यचिकित्सक , गट ब - न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु आहे.
मुलाखतीसंदर्भात :
- प्रशासकीय अधिकारी गट ब- छाननीच्या अनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागांकडून | माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक भरती २०२३- सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागागवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम २०२४ , दि . २६.०२.२०२४ च्या अनुषंगाने आरक्षण निश्चितीकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- तालुका क्रीडा अधिकारी, गट ब- या पदाच्या अर्जांची छाननीची कार्यवाही क्रीडा विभागाच्या तज्ञांकडून सुरु आहे.
परीक्षांसंदर्भात :
- औषध निरीक्षक - प्रस्ताव तूर्त स्थगित ठेवण्याबाबत शासनाकडून कळविण्यात आले आहे.
- महाराष्ट्र वन सेवा, गट अ - सन २०२३ करिता मागणीपत्र प्राप्त झालेले नाही.
- सहाय्यक आयुक्त बीएमसी - न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु आहे.
- सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी ०१ -संबंधित विभागास शिफारशी पाठवण्यात आलेल्या आहेत.
- कनिष्ठ भूवैज्ञानिक आणि सहाय्यक भूवैज्ञानिक - . सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागागवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अनुषंगाने आरक्षण निश्चित करुन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले आहे.
- अधीक्षक, सामान्य राज्यसेवा , गट ब ( १४ महिन्यांपासून ) - आयोगाकडून सदर पदासाठी अभ्यासक्रम दिनांक २१.०३.२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आदी पदांबाबत खुलासा केला.
या पदांबाबत खोटा खुलासा केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप...
भुवैज्ञानिक , गट अ खनिकर्म, पाणीपुरवठा विभागाअंतर्गत असलेले भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाची कनिष्ठ वैज्ञानिक , गट ब ३. सहाय्यक भू वैज्ञानिक गट ब अनुक्रमे १ ९ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाली. सहाय्यक भूभौतिक तज्ञ या पदासाठी ५ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. याबाबत एमपीएससीने कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र आता खुलासा करुन या पदांबाबत शैक्षणिकदृष्ट्या मागागवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम -२०२४, च्या अनुषंगाने आरक्षण निश्चित करुन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. शासनाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती दिली आहे. परंतु या जाहीराती आरक्षणाचा मुद्दा लागू होण्यापूर्वीच्या आहेत. त्यामुळे या पदांसाठी आरक्षणाचा मुद्दा येणारच नाही. त्यामुळे एमपीएससीने दिलेल्या माहिती पूर्णपणे चुकीची आहे. असा आरोप विद्यार्थ्यांनी सीविक मिररला सांगितले. त्यामुळे एमीपएससीने केलेला खुलासा हा केवल जबाबदारी झटकण्यासाठी केला असून एमपीएससीच्या कारभारावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.