संग्रहित छायाचित्र
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे. 'तुमची दहशत दाखवा' अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना कारवाईचे आवाहन केले आहे. तसेच केंद्र सरकारकडे शक्ती कायदा संमत करत तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.
तीन घटना घडल्या असून हे फार लाजिरवाणे आहे. महिला सुरक्षित असणे पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. सर्व मुलींचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. जसे पोर्श प्रकरणात झाले की कोणीतरी आमदार आला, तसे यामध्ये कोणीही तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा. गुन्हेगारांना पोलिसांच्या भीतीने गुन्हा करणे टाळले पाहिजे, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. जर एखादा राजकीय पक्ष मध्यस्थी करत असेल तर पोलिसांनी त्यांची नावे उघड करावीत, असेही त्या म्हणाल्या.
मंदिरात पुजारीही असे करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांची दहशत असली पाहिजे. पोलीस काय करतात हे कळल्याशिवाय हे असले पुरुष थांबणार नाहीत, शक्ती कायदा १० वर्षांपासून अमलात आणलेला नाही. तो बासनात गुंडाळून ठेवला आहे. तो एका वर्षात संमत करावा, अशी आमची पंतप्रधानांकडे मागणी आहे. असा गुन्हा झाल्यास २ महिन्यांत त्याला फाशीच दिली पाहिजे. हायकोर्टातून सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती असा वाव नसावा. त्यांना न्याय मिळता कामा नये, अशी शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.