मिटकरींची गाडी फोडली

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 31 Jul 2024
  • 11:03 am

संग्रहित छायाचित्र

अकोल्यात प्रचंड गोंधळ, राष्ट्रवादी आिण मनसे कार्यकर्ते आमने-सामने

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळासाठी वातावरण तापले होते.  दरम्यान, अमोल मिटकरी यांनी यावर व्यक्त होताना आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही असे म्हटले आहे.

अमोल मिटकरी अकोला शहरातील विश्रामगृहात आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसैनिकांची बाचाबाची झाली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. या हल्ल्यानंतर मिटकरी म्हणाले, “महाराष्ट्राचे नाव घेतात, वर अशाप्रकारे गुंडागिरी करतात. हा भेकड हल्ला आहे. या हल्ल्याने मी घाबरत नाही. हल्ला झाला तेव्हा मी विश्रामगृहात होतो. काही जण मला भेटायला आले होते. त्यासाठी मी येथे आलो होतो. मनसेच्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला. मी त्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार आहे. 

राज ठाकरेंचा सुपारीबहाद्दर म्हणून उल्लेख
दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचे टोलनाक्याचे,  भोंग्याचे किंवा इतर कोणतेही आंदोलन यशस्वी झाले नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखे आहे. 

सुपारीबहाद्दर नेत्यांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला एनडीआरएफचा लाँग फॉर्म माहीत नाही, तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो हा अलीकडच्या काळातील राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे, अशी खिल्लीही अमोल मिटकरी यांनी उडवली आहे.

टी-शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक
मनसे नेते गजानन काळे यांनी मिटकरी यांना प्रत्युत्तर दिले आहे. काळे यांनी एक्सवर एक व्हीडीओ शेअर केला आहे. यामध्ये काळे यांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून नुसती पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. तरी घासलेट चोर तोंड वर करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय. अजित पवारांच्या घरातील सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागलेय, हे अजित पवारांचे यश आहे आणि हा घासलेटचोर राज ठाकरे यांच्या यश-अपयशाच्या बाता मारतोय.

अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढून २ आमदार निवडून आणून दाखवावेत. मग जाहीर मिशी कापून घासलेट चोराच्या हातात ठेवू. उगाच शरद पवारांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका. पक्ष चोरूनही एक खासदार निवडून आणताना तुमच्या अजित पवारांची दमछाक झाली आहे. ते सुनील तटकरे देखील स्वतःच्या हिमतीवर निवडून आलेत. त्यात अजित पवारांचे काहीच योगदान नाही. नुसता टी-शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला… आम्हाला शिकवायचे नाय, लायकीत राहायचे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest